दिवा बेटावर प्राचीन खुणा

0

चिपळूण । जगबुडी नदीच्या संगमावर बहिरवली आणि पलिकडील करंबवणे खाडीच्या मध्यावर तब्बल 8 एकर परिसरात घनदाट जंगलात वसलेल्या दिवा बेटावर दडलेल्या प्राचीन खजिन्याची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारच्या गडकोट संवर्धन समितीचे सदस्य व पुणे येथील डेक्कन कॉलेजचे प्रा. सचिन जोशी यांनी सहकार्‍यांसह बेटावर जाऊन पाहणी केली. यावेळी तेथील जुनाट बांधकामांचे मोजमाप घेतानाच केलेल्या प्राथमिक उत्खननात सापडलेले तांब्याचे नाणे, खापरसह काही अवशेष तपासणीसाठी घेतले गेले असून त्यावर कॉलेजमध्ये संशोधन सुरू आहे.

क्रोकोडाईल पार्क होईल एवढया संख्येने असलेली मगरींची पैदास, पक्षीवैभव आणि निसर्गसौंदयाची उधळण असलेली करंबवणे खाडी ही एक समृद्ध खाडी समजली जाते. याच जलप्रवासात वाशिष्ठी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या संगमावर शिवकालीन बहिरवली गावाजवळच्या खाडीत हे बेट साधारणपणे 8 एकरात पसरलेले आहे. बेटावर दाट जंगल आहे. बेटावर गोडया पाण्याच्या विहिरी आहेत. येथे 6 विहिरी काळया पाषाणात कोरलेल्या असून त्या जोडविहिरी आहेत. शिवाय पूर्ण 2 एकरात तटबंदी आहे. नक्षीदार कबरी, कोनशिला व त्यावर सूर्यफूले इत्यादी गोष्टी आहेत. तसेच गोडया पाण्याच्या आयताकृती टाक्या आहेत. या बेटाचे उत्खनन करून हा प्राचीन खजिना उजेडात आणण्यासाठी निसर्गप्रेमी समीर कोवळे हा युवक धडपड करीत असून त्यासाठी सरकारच्या गडकोट संवर्धन समितीकडेही पाठपुरावा सुरू केला. यासाठी तो पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या संपर्कात आहे. गडकोट संवर्धन समितीचे प्रा. जोशी यांच्यासह काही सदस्यांपर्यंत त्याने ही माहिती पोहोचवली होती. हे बेट खासगी मालकीचे असल्याने समीरने या मालकांकडेही संपर्क साधला आहे.