भिवंडी : दिवा-वसई दरम्यान डिझेल-पुश-पुल गाडीचा 5 सप्टेंबर 1994 पासून शुभारंभ केला होता. त्या दिवशी दिवा येथून सुटलेली गाडी भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवर येताच तत्कालीन आमदार परशुराम टावरे यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शेकडो प्रवाशांनी या रेल्वे गाडीचे जल्लोषात स्वागत केले होते. प्रारंभी दिवा-वसई दरम्यान एकूण 5 प्रवाशी फेर्या होत होत्या. त्यात काही वर्षांनी 2 प्रवाशी फेर्याची वाढ करून ती संख्या 7 वर नेली आहे. 24 वर्षांचा दीर्घ कालावधी लोटूनही दिवा-वसई मार्गावर शटल सर्व्हिस किंवा प्रवाशी फेर्यांमध्ये वाढ करण्याच्या मागण्या सातत्याने केल्या जात असूनही रेल्वे मंत्रालयातर्फे सकारात्मक पाऊले उचलली जात नाहीत. यासाठी लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रवाशी संघटना आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. पण सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत.
देशातील विविध राज्यात ये-जा करणार्या सुमारे 60 एक्स्प्रेस गाड्या भिवंडी रोड रेल्वे स्टेशनवरून ये-जा करतात. त्यात काही थांबतात, तर काही थांबत नाहीत. रेल्वे मंत्रालयाने दिवा-वसई मार्गावर प्रवाशी फेर्या वाढविणे ही काळाची गरज आहे. भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते कोपर रेल्वे स्टेशन हा प्रवास फक्त 10 ते 12 मिनिटांचा आहे. एकदा कोपर रेल्वे स्टेशनवर प्रवाशी पोहचला म्हणजे त्याला मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे किंवा नवी मुंबई येथील इच्छित स्थळी ये जा करता येणार आहे. खासदार कपिल पाटील यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घातले असून प्रवाशी फेर्यांमध्ये तातडीने वाढ करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाबरोबर पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती दिली.