धुळे । लाल दिवा काढून घेण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रशासन व जनतेतील अंतर कमी होण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे. या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागतच करायला हवे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. नागरी सेवा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यक्रम झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, भारतीय स्टेट बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक रवी नायडू उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, 21 एप्रिल हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. आपणही सर्वसामान्य नागरिक आहोत. आपण स्वत:ला वेगळे का समजावे?, त्यामुळे आपण आता लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लाल दिवा, पिवळा दिवा माणसा- माणसामधील अंतर वाढविणार्या गोष्टी होत्या. ते गेले ही चांगली गोष्ट झाली.
गरजेनुसार सेवा पुरविणे प्रशासनाची जबाबदारी
निवासी उपजिल्हाधिकारी हुलवळे म्हणाले, जनतेच्या गरजेनुसार सेवा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नैपुण्यपूर्ण कामगिरी बजावणार्या अधिकार्यांचा नागरी सेवा दिनानिमित्त गौरव करण्यात येतो. त्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळते. तसेच सर्वसामान्य जनतेला उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करुन सेवा उपलब्ध करुन दिल्यास लोकशाहीच्या बळकटीकरणालाही चालना मिळते, असेही नमूद केले. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.