चेन्नई : दिविज शरण आणि पुरव राजा जोडीने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत बिगरमानांकित जोडीने द्वितीय मानांकित अर्जेटिनाच्या ग्युइलरमो डय़ुरान आणि आंद्रेस मोल्टेनी या जोडीवर ६-४, ६-२ असा विजय मिळवला. दिविज आणि पुरव जोडीसाठी एटीपी दर्जाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची ही तिसरी वेळ असणार आहे.
युकी भांब्री, साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन या तिघांच्या पराभवामुळे स्पर्धेच्या एकेरी प्रकारातील भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. दिविज-पुरव जोडीच्या रुपात भारतीय चाहत्यांच्या जेतेपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रोहन बोपण्णा आणि जीवन नेंदूचेझियान जोडीने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत विजय मिळवल्यास अंतिम लढत भारतीय जोडय़ांदरम्यान होण्याची शक्यता आहे. या जोडीने बोगोटा (२०१३), लोस काबोस (२०१६) स्पर्धाचे जेतेपद पटकावले होते. २०१५ मध्ये पुरव राजाने फॅब्रिस मार्टिनच्या साथीने झाग्रेब स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.