सासवड । पुरंदर तालुक्यातील दिवे गावात उभारण्यात येणार्या वाहनांच्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकचे काम वेगाने सुरू असून, येत्या महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येथे जड वाहनांची तपासणी आणि पासिंगचे काम अत्याधुनिक पद्धतीने होणार आहे. भविष्यात या ठिकाणी यशदा’च्या धर्तीवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारण्याचा आरटीओचा मानस आहे.
आरटीओमध्ये वाहनांच्या पासिंगदरम्यान ब्रेक टेस्ट योग्य प्रकारे घेतली जात नाही. या संदर्भात श्रीकांत कर्वे यांनी महाराष्ट्र सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाहनांच्या पासिंग दरम्यान केल्या जाणार्या ब्रेक टेस्टसाठी स्वतंत्र ट्रॅक असावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच स्वतंत्र ट्रॅक नसलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये पासिंगचे कामकाज थांबविण्यात यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. त्यानंतर परिवहन कार्यालयाने न्यायालयाकडून मुदत वाढ घेऊन, ट्रॅक उभारण्याचे आदेश आरटीओंना दिले. त्यामुळे राज्यभरातील आरटीओमध्ये ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथेच आगामी काळात भव्य क्रीडा संकुल आणि उपबाजार यांची निर्मिती करण्याचे प्रायोजित आहे.
200 मीटरचा स्वतंत्र ट्रॅक
पुणे आरटीओने त्यासाठी पुरंदर तालुक्यातील जागेवर ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी वाहनांच्या पासिंगसाठी आणि ब्रेक टेस्टसाठी 200 मीटरचा स्वतंत्र ट्रॅक उभारण्यासाठी राज्य सरकारने 7 कोटी 83 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून दिवे येथे सुमारे 25 एकर जागेवर ट्रॅक उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. लवकरच येथे वाहनांच्या टेस्ट सुरू होतील, अशी अपेक्षा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली.
…तर कामाला वेग
हे काम जलद गतीने सुरू आहे. मात्र येथे अधिकारी किंवा कर्मचारी थांबण्यासाठी मूलभूत अशा कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. पाणी वीज, राहण्याची सुविधा नाही. या सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच खर्या अर्थाने कामाला वेग येईल. साहजिकच यामुळे शासनाला आता प्रथम या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
– संजय राऊत
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे