मिळालेला नफा दिला जीवनधारा विद्यालयाला
तळेगाव । तळेगाव दाभाडे येथील किड्स वर्ल्ड प्ले ग्रुप आणि नर्सरी स्कूलच्या चिमुकल्यांनी दिव्यांग मुलांना मदत करण्याच्या उद्देशाने फन फेअर आयोजित केले होते. आपल्या पालकांसोबत मुलांनी यामध्ये स्टॉल लावले. तसेच जमा झालेला नफा तळेगाव येथील दिव्यांग मुलांच्या जीवनधारा विद्यालयाला मदत स्वरूपात दिला.
600 नागरिकांनी दिली भेट
तळेगावमधील दादा-दादी पार्क येथे हे फन फेअर आयोजित करण्यात आले. फन फेअरमध्ये मुलांच्या पालकांनी देखील सहभाग नोंदवत विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावले. तळेगावातील सुमारे 600 नागरिकांनी या फन फेअरला भेट दिली. या फनफेअर मधून जमा झालेले उत्पन्न शाळेच्या वतीने तळेगावमधील दिव्यांग मुलांच्या जीवनधारा विद्यालयाला मदत म्हणून दिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांवर आदर्श संस्कार होत असून उद्याची आदर्श पिढी यामुळे निर्माण होणार आहे.
मदतीचा निधी जीवनधाराला सुपूर्द
शाळेचे शिक्षक व पालकांनी मिळून ही मदत जीवनधारा शाळेला दिली. यावेळी जीवनधारा विद्यालयाचे संचालक सिद्धपाठक, केअर टेकर तलवार दाम्पत्य यांनी सहकार्य केले. गुलाब सावंत व गुंजन शहा यांनी पालकांतर्फे आपले विचार मांडले. त्यांनी यावेळी किड्स वर्ल्ड शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती शहा यांचे कौतुक कले. सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुप शहा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.