दिव्यांगांना अडीच कोटींच्या साहित्याचे वाटप!

0

जळगाव । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांतून दिव्यांगांसाठी धोरणात आमुलाग्र बदल करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांना अडचणींवर मात करता यावी म्हणून व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी , त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहता येण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून अडीच कोटी रूपयांची उपकरणे व साहित्य देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. केंद्रीय सामाजिक न्याय व हक्क मंत्रालयातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी सागरपार्क येथे दिव्यांगांना मोफत सायकल व उपकरणे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

7 लाख जणांना साहित्य वाटप
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपस्थित रामदास आठवले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारकडून देशात विविध उपक्रमांतून दिव्यांगांना आधार देण्याचे काम होत आहे. आज जिल्ह्यात 2301 जणांना त्याचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत देशात केंद्राकडून 7 लाख जणांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. आपल्या आसपास, परीसरात, मुल जन्माला आल्यावर त्याची वैद्यकिय तपासणी करून विकलांग आहे की नाही, याची खात्री करून घ्या, काही दोष आढळले तर उपचार करून त्याला आपल्यासारखे बोलता, ऐकता व चालता येईल, याची काळजी घ्या. देशात सामाजिक, राजकीय माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. भविष्यातही हे काम चालू राहणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

इच्छाशक्ती बळकट करा
दिव्यांगांनी आपल्या अपंगत्वाबद्दलचा न्यूनगंड मनातून काढून टाकावा. कोणीही स्वतःला कमी लेखू नये, इच्छाशक्तीचे बळ, मनाची तयारी असेल तर चांगल्या माणसाला लाजवले असे काम तुम्ही करू शकता. आज त्यांना देण्यात येणारे सहसाहित्य हे त्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी आहे. त्याचा वापर करा. शासन आपल्या पाठीशी आहे, अशी साद जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी उपस्थित दिव्यांगाना घातली.

स्वस्त धान्य दिव्यांगांच्या घरापर्यंत पोहचवा
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, गिरिश महाजन यांच्या मार्गदर्शनाने जळगाव शहरात सर्वात मोठे आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यानंतर हा दिव्यांगासाठीचा महाराष्ट्रात पहिल्यांदा असा कार्यक्रम जळगावात झाला असल्याचे कौतूक आहेे. दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून पाहिजे तेवढा निधी मिळत नसल्याने तो आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी मंत्री ना. आठवले यांना केली. दिव्यांगांना घरपोच स्वस्त धान्य देण्याच्या योजनेचीही अंमलबजावणी व्हावी अशीे सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.

एल्मिकाकडून सहाय्यक उपकरणांची निर्मिती
दिव्यांगांना काठी, तीनचाकी सायकल, कर्णयंत्र वाटप झाले. यासाठी एक कोटी रुपये केंद्र सरकार व दीड कोटी रुपये पंचायती आखाडा (त्र्यंबकेश्वर) यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात तेरा जणांना साहित्य वाटप करण्यात आले. सहाय्यक उपकरणेे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रा लयाच्या भारत कृत्रिम अवयव निर्मिती (एलिम्को)मार्फत तयार करण्यात येतात. या प्रकल्पांतर्गत दिव्यांगांना तीनचाकी सायकल (बॅटरीवाली व हाताची), कुबड्या, हाताने चालवायची दुचाकी (व्हीलचेअर), आधारकाठी, कृत्रिम हात-पाय, श्रवण यंत्रे, अंधांना लेझर सेंन्सर व ब्रेल लिपीतील मोबाईल व इतर किट, गतीमंद व्यक्तिंना किट दिले जाते. ही संस्था 45 वर्षांपासून दिव्यांगांची उपकरणे तयार करीत असून आतापर्यंत 40 लाख दिव्यांगांना वाटप झाले आहे. आज जिल्ह्यातील 2301 लाभार्थ्यांना 19 प्रकारातील 4082 उपकरणे वाटप करण्यात आली. यात बॅटरीवरील तीनचाकी 7, साधी तीन चाकी 1038, मुले-प्रौढास व्हीलचेअर 102, विशेष व्हीलचेअर 9, कुबड्या 1352, विशेष आधारकाठी 350, श्रवणयंत्रे 810, श्रवणयंत्र बॅटरी 860, अंधांसाठी मोबाईल, विशेष किट, साऊंड प्लेअर 150 आदी साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. धुळे येथील अंजली बाविस्कर यांनी 12 दिव्यांगांसाठी तीनचाकी मोटारसायकली उपलब्ध करून दिल्या होत्या.

पाळधी जि.प.शाळेला एक कोटीचा धनादेश
एम्पती फाउंडेशन (मुंबई) यांच्यातर्फे जामनेर तालुक्यातील पाळधी जिल्हा परिषद शाळेला एक कोटीचा धनादेश सरपंच कमलाकर पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. पाळधी हे गाव मोठे असून शाळेची आवस्था बिकट आहे. या शाळेचे आधुनिकीकरण व डिजीटल बनविण्यासाठी एम्पती फाऊंडेशनतर्फे हा धनादेश देण्यात आला . जि.प.शाळा पाळधीच्या कोनशिलेचे अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

धुळे, नंदुरबार येथे सप्टेंबरमध्ये वाटप
पावसाळा संपल्यानंतर सप्टेबरमध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातदेखील दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मागील महिन्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून नंदुरबार जिल्ह्यात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भागातील लाखो नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला होता.

प्रातिनिधीक वाटप
जगन पाटील, सुभाष नाईक ( दोघे रा- जामनेर, तीन चाकी सायकल), प्रथमेश पाटील(जळगाव) व देवीदास राजवळ (कॅलीबर), कैलास पाटील व सरला पाटील (कर्णयंत्र), सुनिता चौधरी( पाचोरा) व निलेश सिशोद (जामनेर, बॅटरीवर चालणारी सायकल), सुनिता बोदडे व मयुरी पाटील (एमआर किट), मुनाफ तडवी( मुक्ताईनगर) व मिना पाटील(भडगाव, एडीएल किट) आणि विष्णू पाटीलला आधुनिक अंधकाठी देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या भावना समजून प्रोत्साहन देत स्वत: बळकट व्हा, असे आवाहन केले. त्यामुळे त्यांच्या एक प्रकारे स्फूर्ती निर्माण झाल्याचे दिसून येत होेते.

व्यासपीठावर उपस्थिती
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी.नाना पाटील, खासदार रक्षाताई खडसे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अमिर साहब, आमदार हरिभाऊ जावळे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, आमदार स्मिता वाघ, आमदार उन्मेष पाटील, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, महापौर नितीन लढ्ढा, जि.प.सभापती प्रभाकर सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर, समाज कल्याण अधिकारी अनिता राठोड, अपंग संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, महिला बालविकास व पुर्नवसन विकास विभागाच्या अजंली बाविस्कर, प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, आनंद खरात, अनिल अडकमोल यांची उपस्थिती होती. भाजपा व रिपाइंचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.