तळेगाव दाभाडे : हिंदु संस्कृतीमध्ये देवपुजेला अनन्य साधारण महत्व आहे. तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्व दिव्यांगांची सेवा करण्यासाठी आहे. दिव्यांगांचे जीवन म्हणजे संघर्षमय जीवन असते. त्यामुळे या लोकांसाठी आपण जे काम करतो ते देवपुजेइतके महत्वाचे असते. अशा लोकांसाठी काम करणे म्हणजे देवकार्य समजावे, असे प्रतिपादन मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी केले. दिव्यांगांना दिव्यांग असल्याचा दाखला देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार भेगडे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मावळ तालुका भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे होते.
वैशाली मंगल कार्यालय येथे आयोजित दिव्यांग व्यक्तीना दाखला (सर्टीपिकिट) प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, विभावरी दाभाडे, हेमलता खळदे, संध्या भेगडे, काजल गटे, प्राची हेंद्रे, कल्पना पोफळे, राणी म्हाळसकर, किरण राक्षे, डॉ.चंद्रकांत लोहकरे, कैलास पानसरे, वर्षा पाटील आदी उपस्थित होते.
5 टक्के जागा आरक्षीत
यावेळी आमदार भेगडे पुढे म्हणाले की, नव्याने झालेल्या शासन निर्णयानुसार 5 टक्के जागा सरकारी सेवेत आरक्षित आहे. यापुढे दिव्यांग बांधवांना ही संधी उपलब्ध होईल. 21 जानेवारी 2018 ला झालेल्या महाआरोग्य शिबीरात निष्पन्न झालेल्या 157 अपंगांचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी महाआरोग्य शिबीरानंतर 205 दिव्यांग व्यक्तीच्या शस्त्रक्रिया, 76 अपंग बांधवांना साहित्य वाटप, 1384 रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सभापती म्हाळसकर म्हणाले की, अपंग बांधवांना या प्रमाणपत्रामळे शासनाच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने अपंग मित्रांना मदतीचा निधी द्यावा अशा सुचना केल्या. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी या समितीचे अध्यक्ष किरण राक्षे यांनी स्वतंत्रपणे कार्यालय सुरू केले
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, किरण राक्षे, डॉ. ताराचंद कराळे, विजय माळी यांनी मनोगत व्यक्त केले. जितेंद्र बोत्रे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र सातकर यांनी सूत्रसंचालन केले. संदीप काशिद यांनी आभार मानले.