दिव्यांगांसाठीच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

0

पालघर । दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची समाजात जनजागृती व्हायला हवी. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. कोणताही दिव्यांग लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी गुरुवारी येथील नियोजन भवनामध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय योजना पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची
अधिक मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, शासन दिव्यांगांकरिता असंख्य योजना राबवते. परंतु, या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर देऊन ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचायला हव्यात, असे म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर, समाजकल्याण अधिकारी संघरत्ना खिलारे आदी उपस्थित होते.