दिव्यांगांसाठी साहित्य वाटप व मोतीबिंदू तपासणी शिबिर रद्द

0

जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू
जळगाव – पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव ग्रामिण मतदारसंघात धरणगाव व जळगांव तालुक्यातील 300 दिव्यांग बांधवाना साहित्याचे वाटप व 600-700 रुग्णांचे मोतिबिंदू तपासणी व शस्रक्रिया शिबिराचे आयोजन धरणगाव येथिल ग्रामीण रुग्णालयात आज 14 मे 2018 रोजी सोमवारी आयोजित करण्यात आले होते. मात्र कालपासून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील जळगाव जिल्ह्यासह 5 जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते ना.गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण व इतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते 300 दिव्यांगांना 388 साहित्याचे वाटप होणार होते. सदर कार्यक्रमाची जय्यत तयारी देखील करण्यात आली होती तसेच धरणगाव व जळगांव तालुक्यातील सुमारे 700 मोतिबिंदू रुग्णांची तपासणी व शस्रक्रिया शिबिराचेही उद्घाटन करण्यात येणार होते.मात्र जिल्ह्यात ऐनवेळी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आजच्या या कार्यक्रमाला लाभार्थ्यांनी उपस्थित राहू नये तसेच सदर कार्यक्रमाची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे अयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.