दिव्यांगाना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडेंवर गुन्हा दाखल करा

0

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वादग्रस्त सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांना कामानिमित्त भेटायला गेलेल्या दिव्यांग व्यक्तीला त्यांनी केबीनमधून बाहेर जाण्यास सांगितले. दिव्यांगांना झगडे यांनी अपमानास्पद वागणूक दिली असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांची सहाय्यक आयुक्त पदावरून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना संघटनेचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहराध्यक्ष दत्ता भोसले, प्रमोद घुले, रामचंद्र तांबे बुधवारी दुपारी नागरवस्ती विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्या केबीनमध्ये कामानिमित्त गेले होते.

यावेळी झगडे यांनी घुले यांना अपमानास्पद वागणूक देऊन केबीनमधून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे झगडे यांच्यावर अपंग व्यक्ती अधिनियम 2016 व कलम 92 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्यांची सहाय्यक आयुक्त या पदावरून त्वरित हक्कालपट्टी करून त्यांना शासन सेवेत परत पाठवावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने निवेदनातून केली आहे. अन्यथा झगडे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्यापासून झगडे यांची कार्यपद्धती वादग्रस्त राहिली आहे. झगडे या सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कार्यालयातील कर्मचा-यांना क्षुल्लक कारणावरुन त्रास देणे अशा विविध कारणामुळे त्यांची महापालिकेतील कारर्कीद वादग्रस्त राहिली आहे. झगडे या निष्क्रिय आहेत. त्यांचे कामावर लक्ष नाही. त्यामुळे त्यांना राज्य सेवेत परत पाठविण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका उषा मुंडे यांनी नुकतीच केली आहे.