दिव्यांगावर मात करीत संसार थाटण्याच्या जिद्दीला सलाम!

0

90 टक्के दिव्यांग असलेल्या नितीन व सुषमाची विवाहासाठी नोंदणी

चेतन साखरे, जळगाव:सध्याच्या काळात शरीराने आणि मनाने धडधाकट असणार्‍यांच्या संसारात अनेक अडचणी येतात. मात्र जे मूळातच 90 टक्के शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांनी संसार थाटून तो सुखाने करण्याच्या जिद्दीला अनेकांनी सलामच केला पाहिजे. सामाजिक दरीचा विचार न करता फैजपूर येथील नितीन महाजन आणि सुषमा भिडे यांनी गुरुवारी (दि.6) जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहासाठी नोंदणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम यांनी उपवर-वधूला शुभेच्छाही दिल्या.

जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि एकमेकांची साथ असली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ‘घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून’ अशी म्हण प्रचलित आहे. या दोन्ही गोष्टी करतांना भल्याभल्यांची दमछाक होतांना आपण नेहमीच बघतो पण शारीरिक मर्यादांवर मात करून एकमेकांची साथ देण्याची जिद्द उराशी बाळगली ती फैजपूर येथील रहिवासी असलेले नितीन महाजन आणि सुषमा भिडे या दोघांनी.

जिल्हाधिकारी कार्यालयात विवाहनोंदणी प्रसंगी उपस्थित डावीकडून नितीन महाजन, सुषमा भिडे, मंगला भिडे (आई), अक्षय महाजन, गणेश गुरव.

सुषमा भिडे, फैजपूर:
शरीराने दुर्बल आहे म्हणून काय झाले? आम्हालाही वैवाहिक आयुष्य जगण्याचा आनंद घ्यायचाय. आम्ही सुखाने संसार करू. आमच्यामुळे कुणालाही त्रास होऊ देणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आम्ही एकमेकांना साथ देण्याचे ठरविले आहे.

नितीन महाजन, फैजपूर:
शरीराने दुर्बल असलो तरी आम्ही मनाने मात्र दुर्बल नाही. आयुष्यात सुख-दु:ख प्रत्येकाला आहे. पण परिस्थितीवर मात करून आयुष्याचा खरा आनंद आम्हाला घ्यायचा आहे. सुषमा आणि मी आम्ही दोघे सुखाने संसार करू.