नागरी सुविधा केंद्रात स्वीकारले जात नाहीत अर्ज
पिंपरी-चिंचवड : दिव्यांगांसाठी विविध योजना राबविणार्या महापालिकेने दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेतला. मोठा गाजावाजा करत केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. अर्ज वाटप प्रक्रियेची सुरुवात केली. मात्र, नागरी सुविधा केंद्रात योजनेचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. पालिकेच्या नियोजनाअभावी दिव्यांगांना मनस्ताप होत आहे. दरम्यान, महापालिकेने ‘सॉफ्टवेअर’मध्ये बदल केले नसल्यामुळे अर्ज स्वीकारले जात नसल्याचे सांगितले जाते.
नियोजनाअभावी गोंधळ
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते 25 मे रोजी या योजनेचा मोठा गाजावाजा करत सुरुवात करण्यात आली. पेन्शन योजनेच्या अर्ज वितरण करण्यास सुरुवात केली. मात्र, पालिकेने याचे नियोजन केले नाही. ‘सॉफ्टवेअर’मध्ये बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रात पेन्शन योजनेचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. याचा नाहक दिव्यांग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे दिव्यांग नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
नागरी सुविधा क्रेंदाना अर्ज स्वीकारण्याचे सांगितले आहे. नागरी सुविधा केंद्रात अर्ज स्वीकारले जात नसल्यास पालिकेत स्वीकारले जातील. त्यामुळे दिव्यांग नागरिक पालिकेत देखील अर्ज करु शकतात. स्फॉटवेअर’ मध्ये बदल करण्याचे काम तांत्रिक विभागाचे आहे.
-स्मिता झगडे, सहायक आयुक्त, नागरवस्ती विभाग