जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळाचे कामकाज पारदर्शक व नियोजनबद्ध झाले आहे. राज्यातील हा अभिनव प्रयोग आहे. दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी केली जाणारी कार्यवाहीची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शहराचे आ. सुरेश भोळे यांनी केले.
शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी दिव्यांग मंडळात सुवर्ण उद्योजक रतनलाल बाफना यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ दिव्यांग मंडळात पत्र्याच्या शेडचे लोकार्पण आ. भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, उद्योजक राजकुमार बाफना, उप अधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, डॉ. किशोर इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला दिव्यांग मंडळाविषयी अध्यक्ष डॉ. पोटे यांनी माहिती दिली. उद्योजक राजकुमार बाफना यांनी दिव्यांग मंडळाला पत्र्याचे शेड बसवून दिले आहे. आ. राजूमामा भोळे यांनी लोकार्पण केले. प्रसंगी दिव्यांग मंडळाला अपेक्षित ते सहकार्य नक्की करू असे राजकुमार बाफना यांनी सांगितले.
आदर्श कुपन प्रणालीमुळे दिव्यांग मंडळात होणारे दिव्यांग बांधवांचे हाल आता थांबले आहे. पुढील काळात बुधवारची तपासणी दिव्यांग मंडळ येथेच सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. यावेळी युवाचार्य संस्थेचे पंकज शर्मा, राजश्री बाफना, कृणाल बाफना, मोहित बाफना, कवी कासार, राहुल सुरेश पाटील, राहुल तुकाराम पाटील उपस्थित होते.
सूत्रसंचालन चेतन निकम यांनी तर आभार आरती दुसाने यांनी मानले. यशस्वीतेसाठी दिव्यांग मंडळाचे विशाल दळवी, दत्तात्रय पवार, विशाल पाटील, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, अजय जाधव, प्रकाश पाटील आदींनि परिश्रम घेतले.