दिव्यांग महिलेला धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना अटक

0

पालघर । अपंग महिलेला लोकल ट्रेनच्या डब्यात धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी 3 जणांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तीनही आरोपींवर दिव्यांग जनहक्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या कायद्याअन्वये वसई लोहमार्ग पोलिसांनी दाखल केलेला हा पहिलाच गुन्हा आहे. फातिमा डिसोजा (40) या शुक्रवारी वांद्रे येथून चर्चगेटहून निघालेली विरार लोकलमधून प्रवास करत होत्या. त्या दिव्यांगासाठी आरक्षित असललेल्या डब्यात बसल्या होत्या. नालासोपारा येथे उतराण्यासाठी त्या दाराजवळ आल्या तेव्हा चंद्रकांत सोलंकी त्यांची पत्नी शारदा सोलंकी आणि निता सोलंकी हे तिघे दारात उभे होते. त्यावरून डिसोजा यांच्याशी त्यांचा वाद झाला. या तिघांनी डिसोजा यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना नालासोपारा स्थानकात उतरू दिले नाही. त्यामुळे त्यांना पुढील विरार स्थानकात उतरावे लागले.

पहिल्यांदा गुन्हा दाखल
याप्रकरणी डिसोजा यांनी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून वसई रेल्वे पोलिसांनी दिव्यांग जनहक्क कायदा 2016 अन्वये या तिघांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितेल. रेल्वे पोलिसांकडून या कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिव्यांगाच्या डब्यात दिव्यांगेत्तर प्रवाशांची दादागिरी होत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या घटनांबाबत अनेकवेळा तक्रारी करून सुद्धा पोलीस आरपीएफ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप फातिमा डिसोजा यांनी केला आहे.