दिव्यांग मित्राच्या कुटुंबियास मित्र परिवाराकडून आर्थिक मदत

0

एरंडोल । आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या अठ्ठावीस वर्षीय दिव्यांग युवक मित्राचे अचानक निधन झाल्याने त्याच्या परिवारास कॉलेज मधील एकत्रित शिक्षण घेणार्‍या मित्र परिवाराने आर्थिक मदत करून मित्र प्रेमाची व माणुसकीची जाणीव करून दिली. मित्र परिवाराने जातीपातीच्या भिंती तोडुन राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी की बोरगाव खु.ता.धरणगाव येथील गणेश पुरुषोत्तम गुरव (वय 28) या दिव्यांग तरुणाचे आकस्मित निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कर्ता म्हणून गणेश हा दिव्यांग असल्यामुळे त्याचेकडून कोणतेही जड काम होत नसल्यामुळे त्याने गावातीलच लहान मुलांना शिकविण्याचे खासगी क्लास सुरु केले.

परीवारात दुसर्‍यांदा दुःखाचा डोंगर
क्लास मधुन मिळणार्‍या अल्पशा फी वर तो त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करू लागला. मात्र नियतीने गुरव परिवारावर पुन्हा घाला घातला. गणेश गुरव यास पोट दुखीचा आजार लागला व अचानक त्याचा 10 जुलै रोजी मृत्यु झाल्यामुळे संपुर्ण गावावर शोककळा पसरली. कुटुंबाचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या गणेशचे निधन झाल्यामुळे त्याच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले. गणेश गुरवच्या निधनाची बातमी त्याच्या संपुर्ण मित्र परिवार असलेल्या बीफॉम डीडीएसपी या नावाने असलेल्या मित्रांच्या व्हॉटसअप गृपवर येताच सर्व मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

व्हॉटस्अ‍ॅप गृपच्या माध्यमातून जमविली रक्कम
गृपचे सदस्य असलेल्या निरंजन परदेशी यांनी आपण सर्व मित्र परिवाराने गणेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन ग्रुपवर केले. त्याच्या आवाहनास सर्व मित्रांनी प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष कार्यास सुरुवात केली. गृपचे सदस्य निरंजन परदेशी, विशाल पाटील, गुरुदास महाजन, अमेय भेलसेकर, निलेश मराठे, चंद्रमणी शिंदे, योगेश येवले, विजय चिंचोले, दीपक महाजन, योगेश वाणी, सागर सोनार, कुलभुषण पांडे, किरण मराठे, सचिन महाजन, संदीप वाघ, निलेश पाटील, पंकज महाजन, प्रशांत साळी, पुरुषोत्तम पाटील, हितेश शर्मा, शेखर पाटील, भुषण बियाणी, भुषण भोई यांनी एकत्रितपणे जमा केलेली 16 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत मैत्री दिनी दिव्यांग गणेश गुरव याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करून माणुसकीचे उदाहरण दाखवुन दिले. गणेश गुरवच्या मित्र परिवाराने केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे.