दिव्यांग मुलाचा मृत्यू; महापौरांचे चौकशीचे आदेश

0

पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील महापालिकेच्या इलेक्ट्रिक पोलचा शॉक बसून नऊ वर्षाच्या एका दिव्यांग मुलाचा मृत्यू झाला. याचे पडसाद  महासभेत उमटले. महापालिकेच्या चुकीमुळे दिव्यांग मुलाचा मृत्यू झाला आहे. या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकाने केली. त्यावर महापौर नितीन काळजे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दिव्यांग मुलाच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी सूचना देखील केली आहे.

वीज खांबाला झाला स्पर्श
हरीओम विनायक नराल (वय 9, रा. सेक्टर नंबर 22, प्राधिकरण, निगडी), असे मृत्यू झालेल्या दिव्यांग मुलाचे नाव आहे. हरिओम हा मंगळवारी (दि. 26) रात्री दहाच्या सुमारास प्राधिकरणातून जात होता. त्यावेळी त्याचा इलेक्ट्रिक खांबाला हात लागल्याने जोरात शॉक बसला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

महासभेत उमटले पडसाद
मनसेचे सचिन चिखले म्हणाले, हरिओम हा दिव्यांग होता. कुटुंबात एकुलता एक होता. पालिकेच्या इलेक्ट्रिक पोलला हात लागल्याने शॉक बसून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या कुटुंबाला पालिकेने आर्थिक मदत करावी. राष्ट्रवादी काँग्रेसचे जावेद शेख म्हणाले, पालिकेच्या इलेक्ट्रिक पोलला हात लागल्याने शॉक बसून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण आहे. पालिकेच्या चुकीमुळे दिव्यांग मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. याला पालिकाच जबाबदार आहे. पालिकेचे अभियंते काय करत होते. नराल कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत करावी. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.

याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच हरीओम नराल याच्या कुटुंबियांना नियमात बसत असल्यास आर्थिक मदत करण्याचे आदेश महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला दिले आहेत.