दिव्यांग विकासासाठी प्रयत्नशिल

0

धुळे । दिव्यांग बांधवांना समाजात न्याय, प्रतिष्ठा, सन्मान देण्यासोबतच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी भारत सरकारतर्फे विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. त्या माध्यमातून दिव्यांगांचे मनोबल उंचवावे, आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे. यासाठी सामाजिक न्याय विभाग सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. जिल्हा संकुलात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना विविध उपकरणाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे, जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खासदार डॉ.हीना गावित, मधुकर गर्दे, माजी आमदार प्रा.शरद पाटील, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन गुंडे, समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, हिलाल माळी, अनुप अग्रवाल, संजय पगारे, शशीकांत वाघ, पंकज साळुंके आदी उपस्थित होते.

केंद्राकडे पाठपुरावा
नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून याठिकाणीदेखील दिव्यांगांना सामाजिक न्याय विभागातर्फे साहित्याचे वितरण करण्याचा कार्यक्रम घेतला जाईल, असेही मनोगत ना. आठवले यांनी व्यक्त केले. धुळे, शिंदखेडा तालुक्यासाठी संजीवनी ठरणार्‍या सुलवाडे- जामफळ-कनोली सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. परंतु सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन 2 हजार 360 कोटींचा निधी मंजूर करुन घेतला.

शिबीरे घेण्यात येईल
सामाजिक न्याय विभागातर्फे दीन-दलित, आदिवासी, कष्टकरी, समाजापर्यंत कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जणांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने विशेष नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. आगामी काळात देशातील प्रत्येक जिल्ह्यात शारीरिक दुर्बलघटकांना एडीआयपी व राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी शिबीरे घेण्यात येतील.

आर्थिक जीवनमान उंचावेल
सिंचन प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, दुष्काळग्रस्त परिस्थितीशी शेतकर्‍यांना सामना करण्याची वेळ येणार नाही. धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचे तीन महिन्यांत भूमिपूजन करणत येईल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी केले. भारतीय कृत्रिम अंग निर्माण मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना यात वयोश्री योजनेतील 1 हजार 860 तर दिव्यांग योजनेतील 631 लाभार्थी होते. या सर्वांना व्हील चेअर, खुर्ची, काठी, श्रवणयंत्र, स्मार्ट फोन, तीनचाकी सायकल आदी साहित्याचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.