सध्याचे युग आधुनिक वगैरे आहे. माहिती तंत्रज्ञानाने मोठी क्रांती केली असून, आपण खरोखरंच एका ग्लोबल व्हिलेजसारखे जवळ आलो आहोत. ये हृदयीचे ते हृदयी काही क्षणांत पोहोचण्याची व्यवस्था आजच्या जगात उपलब्ध आहे. एकीकडे विचार करता हे सगळे आधुनिक रूप फारच लुभावणारे आहे. पण या सगळ्या बदलात आपले विचार बदलले का, हा प्रश्नच आहे. काही जुन्या समजुतींना आपण इतके घट्ट चिकटून बसलो आहोत, की त्या बदलायच्या कशा असाच प्रश्न आजही कायम आहे. वंशाचा दिवा, ही अशीच एक समजूत. मुलगा हा वंशाचा दिवा असल्याने आपल्याला मुलगाच झाला पाहिजे, हा अट्टाहास धरला जातो. तो का, या प्रश्नाचे उत्तर आजच्या आधुनिक जगात शोधूनही सापडत नाही. हे सगळे मांडायचे निमित्त आहे नांदेडमधील एक घटना.
नांदेडच्या चौफाळा भागातील एका कुटुंबाने आपल्या तिन्ही सुनांना मुलगीच झाली, म्हणून चक्क घराबाहेर हाकलले! हे कुटुंब चांगले शिकले सवरलेले आहे. या कुटुंबातील तीन भावांचे लग्न ठरावीक अंतराने झाले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवणार्या या तिन्ही सुनांच्या पोटी मुली जन्मल्याने या कुटुंबाने घरच्या लक्ष्मीलाच बाहेरचा रस्ता दाखवला. धक्कादायक बाब पुढेच आहे. या तिघींपैकी दोघींचे पती सरकारी कर्मचारी आहेत. खरेतर अशा सरकारी कर्मचार्यांना जरब बसवण्यासाठी त्यांना लगेचच सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला जाणे गरजेचे आहे. ’बेटी बचावो, बेटी पढाओ’ हे राज्य आणि केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानालाच सरकारी कर्मचारी असलेल्या बापांनी हरताळ फासला आहे. नांदेडच्या पोलीस प्रमुखांकडे संबंधित सुनांनी दाद मागितली आहे. परंतु, आमचे कोणीच काही करू शकत नाही, अशी धमकी हे सरकारी कर्मचारी पीडित महिलांच्या कुटुंबीयांना देत असल्याने या तिन्ही सुनांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
या घटनेमुळे महात्मा फुलेंची मला आवर्जुन आठवण आली. समतेचा विचार मांडणारा आणि त्यानुसार आपले आयुष्य जगलेला हा महात्मा. अपत्य होत नाही, म्हणून ज्योतिरावांचे दुसरे लग्न करून द्यायचा विचार त्यांचे नातेवाईक करत होते. अपत्य होत नाही यात दोष सावित्रीचाच कशावरून, माझा कशावरून नाही, अशी विचारणा करत ज्योतिरावांनी आपले कुटुंबीय व नातेवाइकांना निरुत्तर केले होते. दीडशे वर्षांपूर्वीची ही घटना आहे, हे लक्षात घेतले, तर ज्योतिरावांचे धाडस लक्षात येईल. रुढी-परंपरांनी बद्ध असलेल्या समाजात आणि विशेष करून मूल न होण्यात महिलेचाच दोष असतो, असा गैरसमज घट्ट रुजलेल्या समाजात ज्योतिरावांनी उघडपणे असा सवाल करणे, हाच गहजब होता. परंतु, त्यांनी ते धाडस दाखवले. आजच्या आधुनिक युगातील किती पुरुषांत असे धाडस आहे? अशा या माहात्म्याचा वारसा सांगायचा आणि त्यांची शिकवण मातीत मिसळायची, असे आपले वर्तन आहे.
राज्य सरकारने गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी राज्यात ’नकोशी’ ही नावे असलेल्या मुलींची नावे बदलण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु, ती काही दिवस चालली आणि कोणत्याही सरकारी योजनेप्रमाणे पुढे ती बंदही पडली. म्हणजे अधिकृतरीत्या ती बंद वगैरे झालेली नसावी. पण आता ती कुठे सुरू असल्याचेही दिसत नाही. अशा अनेक नकोशांची प्रकरणे पुढे येत आहेत. पण त्यांचे नामकरण झाल्याचे काही वाचनात आलेले नाही. अत्यंत कडक कायदे करूनही स्त्रीभ्रूण हत्या थांबल्याचे दिसलेले नाही. गर्भातल्या कळ्या खुडण्यात काय पुरुषार्थ आहे, हे न आकलणारे कोडे आहे. यानिमित्ताने मी सहज काही आकडेवारी चाळली आणि आणखी एक धक्का बसलाच. ही आकडेवारी होती लिंग गुणोत्तराची. साध्या शब्दांत सांगायचे, तर दर हजारी मुले व मुलांच्या जन्माचे प्रमाण किती, याची आकडेवारी. राज्याच्या आरोग्य विभागानेच ती जाहीर केलेली आहे. राज्यात 2016चे लिंग गुणोत्तर हजार मुलांमागे केवळ 899 मुली असे आहे. ही राज्यासाठी शरमेची बाब नाही? याच अहवालात 2015मध्ये महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हजार मुलांमागे 907 मुली इतके होते. म्हणजे स्त्रीभ्रूणहत्येबाबत कडक वगैरे कायदे असतानाही गेल्या वर्षी आपली अधोगती का झाली, याचे विश्लेषण कसे करायचे? या आकडेवारीत आणखीही काही गमतीजमती आहेत. भंडारा हा जिल्हा काही आपण प्रगत मानत नाही. किंबहुना मागास भाग म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. त्याच भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सुमारे 78 टक्क्यांनी वाढला आहे. त्यापाठोपाठ परभणी आणि लातूरचा क्रमांक लागतो. समतेचा विचार हिरिरीने मांडणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्या. महादेव गोविंद रानडे, र. धों. कर्वे यांची कर्मभूूमी असलेले, विद्येचे माहेरघर म्हणून आणि पुरोगामी म्हणून परिचित असलेल्या पुण्यातील आकडेवारी काय आहे? या पुरोगामी पुण्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटते आहे, असे हा अहवालच सांगतो! ही चिंताजनक बाब नाही? आपल्याला यात काही गंभीर वाटत नसेल, तर तेच चिंताजनक ठरेल. आजच्या आधुनिक युगात मुलगी नको, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे अशा चालीरीतींना खतपाणी मिळते आहे. तेही सुशिक्षितांंकडून! एकीकडे मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश वारंवार दिला जातो, तर दुसरीकडे मुलगी झाली, की तिला नकोशी म्हणून बाजूला केले जाते. मानसिकतेतील ही विसंगती बदलण्यासाठी नव्याने कंबर कसायला हवी. तशी ती कसली तरच दिव्याखालचा अंधार दूर होईल.
गोपाळ जोशी – 9922421535