नंदुरबार। नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या बहुचर्चित इमारतींच्या बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. सत्ताधारी नगरसेवकाने या बाबत गंभीर तक्रार केली असली तरी नगरपालिका प्रशासनाने दीडवर्षं होऊन देखील कारवाई न करता व्यापाऱ्यांच्या भूमिकेपुढे गुडघे टेकले असल्याचा आरोप आता केला जातो आहे,
नंदुरबार शहरात सध्या अनधिकृत बांधकामांची जणू स्पर्धाच रंगली आहे. घरांचे बांधकाम असो की व्यापारी संकुल असो त्या पालिकेच्या जागेवर थोडेफार अतिक्रमण केल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. त्याच प्रमाणे पालिकेकडे बांधकामासाठी कोणता प्रस्ताव पाठवायचा आणि प्रत्यक्ष मात्र बांधकाम कसे करायचे ही रितच पडली आहे, नगरपालिका शेजारी सर्व्हे नंबर ४५१ अ/१ च्या जागेवर काही व्यापार्यांनी दि.२५ जुलै २०१७ रोजी निवासासाठी बांधकामाची परवानगी घेतली. परंतू परवानगी प्लींथ लेवलपर्यंत निवासी बांधकामासाठी देण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. याबाबत सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी मुख्याधिकार्यांकडे तक्रार करुन अवैध बांधकाम पाडण्यात यावी, अशी मागणी केली. या तक्रारीनंतर पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी संबंधीत व्यापार्यांना नोटीसा देवून अवैध बांधकाम ३० दिवसाच्या आत काढून टाकावे, अन्यथा पालिकेमार्फत काढल्यास त्याचा खर्चही वसुल करण्यात येईल, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही संबंधीत व्यापार्यांनी निवासाची परवानगी दाखवून बांधकाम सुरूच ठेवले आहे, एकंदरीतच मुख्याधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, याशिवाय बांधकाम हे निवासी बांधकामाच्या परवानगीपेक्षा जादा बांधण्यात आले आहे. मुख्याधिकार्यांच्या नोटीसीला दीड वर्ष झाले तरीही बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाने मात्र या प्रकरणात हतबलता दाखवली आहे,