प्रमाणत्र नुतनीकरणासाठी खाजगी दलालकडून पैशांची मागणी ; लोकशाही तक्रारीनंतरही आधीच्या 40 टक्कयांऐवजी 15 टक्के अपंगत्व असल्याबाबतचे कार्ड
जळगाव- जिल्हा रुग्णालयात अपंगत्व नुतनीकरणाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी खाजगी पंटरने तीन हजार तसेच कागदपत्रे घेतले. तीन ते चार महिने उलटूनही पंटरने नूतनीनकरण प्रमाणपत्र न देता दिलेले तीन हजार रुपये गडप करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे. फसवणुकीची खात्री झाल्यावर हाताने अपंगत्व असलेले विश्वास रंगराव पाटील वय 47 रा. कंकराज ता.पारोळा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरुन उमेश पाटील नामक खाजगी पंटर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यानच्या काळात लोकशाही दिनापर्यंत धाव घेतली. न्याय न मिळता, उलट 40 टक्के अपंगत्व असतांना केवळ 15 टक्के अपंगत्व असल्याबाबत, तीन महिने मुदतीचे कार्ड मिळाल्याने विश्वास पाटील यांची प्रशासनाकडून उपेक्षाच करण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
जन्मापासून उजव्या हाताचे अपंगत्व
पारोळा तालुक्यातील कंकराज येथील रहिवासी विश्वास रंगराव पाटील हे जळगाव शहरातील विश्वभारती सिक्युरीत गार्ड या कंपनीत सिक्युरीटी गार्ड म्हणून कार्यरत आहेत. जन्मापासून उजव्या हाताचे अपंगत्व आहे. शासनाचे त्यांना 40 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. या प्रमाणपत्राची मुदत 12 सप्टेंबर 2019 रोजी संपल्यावर ते नुतनीकरण करण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी विश्वास पाटील यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी कार्यरत शेख नामक या डॉक्टरने विश्वास पाटील यांची तपासणी केली. यानंतर अपंगत्वात सुधारणा होईल असे सांगून डॉ. शेख यांनी रुग्णायात दाखल व्हावे असे सांगितले. रुग्णालयात दाखल होण्यास पाटील यांनी संमती दर्शविली. मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही.
खाजगी पंटरला पैसे दिल्यावर होणार काम…
पहिला अनुभव सोबत असलेल्या विश्वास पाटील यांनी 25 सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी काही व्यक्तींकडून त्यांनी खाजगी पंटरांना पैसे द्यावे लागतात, यानंतरच अपंगत्व प्रमाणपत्राचे नुतनीकरण होते असे विश्वास पाटील यांना कळाले. अशा खाजगी पंटरची माहिती घेतली असता, उमेश पाटील याचे नाव विश्वास पाटील यांना कळाले. उमेशची भेट घेतल्यावर पहिल्याच भेटीव त्याने विश्वास पाटील यांना काम करुन देण्याच्या मोबदल्यास 5 हजार रुपयांची मागणी केली. यास विश्वास पाटील यांनी नकार दिल्यावर 3 हजार रुपयात काम करुन देण्याचे ठरले. त्यानुसार पंटर उमेशने जुने प्रमाणपत्र, आधार कार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, अपंगत्वाचा ऑनलाईन फॉर्म, सिव्हील हॉस्पिटलचा केसपेपर, उजव्या हाताच्या एक्सरेची प्रत व 3 हजार रुपये घेतले. तात्पुरत्या स्वरुपाचे कार्ड कायमस्वरुपीचे करु देईन, 40 टक्के असलेले अपंगत्व असतांना 45 टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र देईल, असे टूम भरत त्याने स्वतः 9421377525 हा मोबाईल नंबर संपर्कासाठी विश्वास पाटील यांना दिला.
पैसेही गेले अन् प्रमाणपत्रही मिळाले नाही
प्रमाणपत्र तयार झाल्याबाबत विश्वास पाटील यांनी वेळावेळी उमेश पाटील यास संपर्क साधला. मात्र तो उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळ मारुन नेत होता. अशाप्रमारे तीन ते चार महिने उलटूनही विश्वास पाटील यांना अपंगत्व नुतनीकरण झालेले प्रमाणपत्र मिळाले नाही. भेट घेतल्यावर उमेशने चक्क ओळखण्यास नकार दिला. यानंतर विश्वास पाटील यांना फसवणुकीची खात्री झाल्यावर 10 फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पंटर उमेश पाटील याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तपास प्रशांत पाठक हे करीत आहेत.
पोलीस ठाण्यापर्यंत येण्याची वेळ आली
फसवणूक झाल्यानंतर विश्वास पाटील यांनी अपंगत्व प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पुन्हा जिल्हा रुग्णालय गाठले. याठिकाणी दहा हजार रुपयांची मागणी झाली. पैसे देणे शक्य नसल्याने, हक्क असतांनाही उपेक्षा होत असल्याने याप्रकाराबाबत पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी होणार्या लोकशाही दिनात तक्रार केली. याठिकाणी 6 जानेवारी, 3 फेब्रुवारी या दोन तारखानंतर 4 रोजी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून अपंगत्व नुतनीकरणाचे स्मार्ट कार्ड मिळाले. 40 टक्के जन्मता अपंगत्व असतांना केवळ 15 टक्के अपंगत्वाचे कार्ड व तेही तात्पुरत्या तीन महिन्या मुदतीचे हे बघितल्यावर विश्वास पाटील यांना धक्काच बसला. जन्मता इतरांप्रमाणे न राहता जन्मापासून हाताला 40 अपंगत्व देवून नशीबाने तर थट्टा केली. मात्र प्रशासनानेही उपेक्षा करुन थट्टा केल्याचे विश्वास पाटील यांनी बोलतांना सांगितले. कष्टाजे पैसे परत मिळावेत म्हणून पोलीस ठाण्यापर्यंत येण्याची वेळ आली. पैसे घेणार्या पंटरबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. यानंतरही मिळालेल्या कार्डबाबत पुन्हा लोकशाही दिनात धाव घेणार असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढा देणार असल्याचेही विश्वास पाटील म्हणाले.