दिशादर्शक कमानींहीवरही अनधिकृत फलक

0

पुणे । प्रतिनिधी शहरातील अनेक जागांवर अनधिकृत फलक लागले असून रस्त्यांवरील दिशादर्शक कमानीही त्यातून सुटलेल्या नाहीत. त्यामुळे शहरात रस्त्यांना विद्रुप स्वरूप आले असून अनधिकृत फलकांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. प्रवाशांसाठी पथदर्शक फलक आणि कमानी असाव्यात हा साधा
नियम आहे.

सध्या शहरात अनेक महोत्सव आणि कार्यक्रमांचे वातावरण आहे. याशिवाय राजकीय नेत्यांचे वाढदिवस, अभिनंदन असे फलक लावण्याचा सिलसिला बाराही महिने सुरूच असतो. सध्या टिळक चौक, सेनापती बापट रस्ता, बाणेर रोड अशा अनेक ठिकाणी असणार्‍या कमानींवर राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक झळकत आहेत. त्यावर कारवाई करण्याऐवजी महापालिका वाढदिवस झाल्यावर लावणारेच स्वतःहून फलक काढण्याची वाट बघत आहे. शहराचे विद्रुपीकरण सुरू असून त्याबाबत आवाज उठवण्यासही कोणी तयार नाही.

केवळ कारवाईची आकडेवारी
स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या शहरात मात्र दिशादर्शक कमानी अनधिकृत फलक लावण्यासाठीची सोयीस्कर जागा बनल्या आहेत. शहरातील सर्व खांब, रस्त्यांचे कोपरे अनधिकृत फलकांनी भरलेले असतात. महापालिकेचा आकाशचिन्ह आणि परवाना विभाग यावर कोणतीही हालचाल न करता कारवाईची आकडेवारी दाखवण्यात गर्क आहे. प्रशासन तात्पुर्ती कारवाई करत असल्याने दिवसेंदिवस याचे पेव वाढत आहे.