दीडशे वर्षे जुन्या जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था

0

इंदापूर । इंदापूर नगरपरिषद मालोजीराजे भवन शेजारी दीडशे वर्षे जुनी असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 व 2 पूर्णपणे मोडकळीस व धोकादायक स्थितीत असल्याने केव्हाही अचानकपणे कोसळून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून मनसे इंदापूर तालुकाध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार, पाठपुरावा करूनही कोणीच याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने पाचशेच्या आसपास संख्या असणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

जि.प.शाळा 1 व 2 ही इमारत 1867 साली बांधण्यात आली. इंदापूर परिररातील आजवर अनेक विद्यार्थी याच शाळेत घडले आहेत. शाळेस भेट देऊन आमदारांपासून सर्वांनीच बांधकाम दुरुस्तीबाबत निधी उपलब्ध करून देण्याची केवळ आश्‍वासने दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून बांधकाम दुरुस्तीसाठी प्रयत्न केला. परंतु पंचायत समिती, नगरपरिषद प्रशासन या दोघांच्या श्रेय घेण्याच्या वादात इतर खासगीत काम करू देण्यास दोघांनीही हरकत घेऊन आडकाठी निर्माण केली. या दोघांच्या वादामुळे इमारत मात्र आहे तशीच राहिली.

काही दिवसांपूर्वी हजारे यांनी याबाबत तहसीलदार श्रीकांत पाटील यांचेकडे पाठपुरावा तक्रार करून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळेची इमारत धोकादायक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तहसीलदारांनी तातडीने गटशिक्षणाधीकार्‍यांना नोटीस देऊन शासन निर्णयाप्रमाणे योग्य ती कारवाई करावी असे आदेश दिले. वरिष्ठ शिक्षणाधिकारी यांना दुरुस्तीबाबतचे पत्र पाठवून पाठपुरावा केला. परंतु त्यांचाही अहवाल अद्याप दप्तरातच पडून असल्याने इमारत दुरुस्तीचा मुहूर्त कधी मिळणार? हा मोठा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. तहसीलदारांच्या आदेशामुळे नगरपरिषदेनेही गटशिक्षणाधिकारी यांना ना हरकत पत्र दिलेले आहे, तरीही काम मार्गी लागत नाही.

दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक जबाबदार
वास्तविक नगरपरिषदेत 2007 साली सत्ताबदल होऊन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील गटाची सत्ता आली. पाटील वीस वर्षे मंत्रिपदावर व सत्तेत राहिले. परंतु त्यांनी शाळा दुरुस्तीबाबत कधी आस्था दाखविली नाही. 2014मध्ये सत्ता बदल होऊन राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार झाले. त्यांच्याकडेही हजारे यांनी पाठपुरावा केला. परंतु आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी जिल्हापरिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनीही केवळ आश्‍वासनच दिले. शाळेच्या या दुरवस्थेला दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे.

आवारात उंदीर-घुशींचा मुक्त संचार
शाळेतील वर्ग खोल्या, शौचालये, पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ असणारे घाणीचे साम्राज्य व दुर्गंधीयुक्त वातावरण, शाळा आवारात कचर्‍याचे ढिगारे, पोर्चमधील फरशांची दुरवस्था, वर्गखोलीतील दुर्गंधी व घाण, अस्वच्छता, शेडचे उडून गेलेले पत्रे व शेडचे अनेक निघालेले खांब, दुर्गंधीयुक्त व पडझड झालेल्या मुतार्‍या व घाणीच्या साम्राज्यातील शौचालये या सर्वामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शाळेच्या एका ग्रील गेटजवळ विटांचे व माती ढिगारे, आवारात उंदीर-घुशींचा मुक्त संचार आहे. शाळेच्या या दुरवस्थेकडे लक्ष देऊन परिस्थिती सुधारावी अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांना मदत
इंदापूर नगरपरिषद माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी विचार मंथन ग्रुपच्या माध्यमातून जेवणाच्या खोलीत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना मॅट उपलब्ध करून दिले. यावेळी संस्थेचे सदस्य अशोक पोळ, नितीन आरडे, गणेश कदम आदी उपस्थित होते.