कात्रज । परगावावरून पहाटे तसेच मध्यरात्री आलेल्या प्रवाशांना रिक्षा चालकांकडून मनमानी भाडे सांगून मोठ्या प्रमाणात लुटले जात आहे. संगमवाडी ब्रीज ते शिवाजीनगर येथील केवळ दीड किलोमीटरच्या अंतरासाठी दीडशे ते दोनशे रुपये आकारले जातात. इतकेच नव्हे तर येथून कात्रज, हडपसर, बाणेर, कोथरूड आदी ठिकाणी जायचे असल्यास चक्क पाचशे ते आठशे रुपयांची मागणी केली जाते.ट्रॅव्हल्स गाड्या पहाटेच्या सुमारास शहरातील स्थानकांवर येतात. तर जाणार्या ट्रॅव्हल्स रात्रीच्या सुमारास सुटतात. परगावावरून पहाटेच्या सुमारास आलेल्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीच्या पीएमपी बस उपलब्ध नसतात. त्यामुळे येथून प्रवाशांना शिवाजीनगर बसस्थानक हा एकमेव पर्याय उपलब्ध असतो. या प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
संगमवाडीब्रीज ते शिवाजीनगर हे अंतर एक ते दीड किलोमीटरचे आहे. यामुळे हातातील बॅगा तसेच सामान घेऊन तेथपर्यंत चालत जाणे प्रवाशांना शक्य नसते. तसेच प्रवासीही आठ ते बारा तासांचा प्रवास करून थकून आलेले असतात. नेमका याचाच फायदा येथील रिक्षा चालक उठवतात. संगमवाडी ब्रीज ते शिवाजीनगर येथे जाण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये आकारले जातात. हे अंतर लक्षात घेता मीटरप्रमाणे 30 ते 40 रुपये भाडे होऊ शकते. मात्र अडलेल्या प्रवाशांना मनमानी भाडे सांगून लुटले जाते.
परगावी जाऊ शकतील इतके भाडे…
संगमवाडीसारखाच प्रकार पुणे स्टेशन येथे पहाटेच्या सुमारास सर्रास घडतो. येथे परप्रांतातून मोठ्या प्रमाणात ट्रेन येत असतात. यामुळे प्रवाशांची संख्याही मोठी असते. बहुतेक प्रवासी नातेवाईक, नोकरी, रोजगार, शिक्षण या निमित्त आलेले असतात. यामुळे त्यांना बसथांबा व इच्छित स्थळाची माहिती नसते. प्रवाशांच्या बोलण्यावरूनच रिक्षाचालक त्यांना हेरतात. यानंतर मनमानी भाडे सांगितले जाते. पहाटेच्या वेळी तक्रार कुठे करायची तसेच भांडणे करण्यापेक्षा निमूटपणे प्रवाशांकडून पैसे काढून दिले जातात. रेल्वे किंवा ट्रॅव्हलने परगावी जाण्यासाठी जितके तिकीट लागते तितकी रक्कम अनेकदा चार ते पाच किलोमीटरसाठी रिक्षाचालक घेतात.
पहाटेच नव्हे दिवसाही लूटच
इतकेच नव्हे तर येथून कात्रज, हडपसर, बाणेर, कोथरूड आदी ठिकाणी जायचे असल्यास सर्रास पाचशे ते आठशे रुपयांची मागणी केली जाते. ही लूट संघटीतपणे केली जाते. रिक्षाचालक एकत्रित असल्याने प्रवाशांना कोणताच पर्याय उपलब्ध होत नाही. पहाटेही लूट होत असतेच; मात्र सकाळी व दिवसाही येथून शिवाजीनगर किंवा स्वारगेटला जायचे असले तरी दीडशे ते दोनशेच रुपये सांगितले जातात.