दीड कोटींच्या भंगाराची करणार विक्री

0
विधी समितीने दिली मंजुरी
पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जुने व निरूपयोगी साहित्य जमा झालेले आहे. जूने, निरुपयोगी साहित्य फेरवापरास अयोग्य असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने हे साहित्य भंगारमध्ये विकण्याचे निश्‍चित केले आहे. पालिका प्रशासनाने सुमारे दीड कोटी अशी रक्कम निर्धारित केली आहे. त्या भंगार साहित्याची विक्री चालू बाजार भावानुसार काढून भंगार साहित्याचे एकूण अंदाजित मूल्यापेक्षा अधिक रक्कम देणार्‍या ठेकेदारास थेट पद्घतीने भंगार साहित्याची विक्री करण्यास विधी समितीने नुकतीच मंजुरी दिल्याचे विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांनी सांगितले.
शुक्रवारी झाली बैठक
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये हे साहित्य जमा झाले आहे. त्यासाठी महापालिकेच्या विधी समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी हे भंगार साहित्य विकण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी समिती सदस्य सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संगिता ताम्हाणे, सुमन पवळे, निकिता कदम, मनिषा पवार, उषा ढोरे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडे जुने, निरुपयोगी भंगार पडून आहे. सुमारे दीड कोटीचे भंगार निरुपयोगी झाले असून ते फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिकेने या भंगाराचा लिलाव करण्याचे ठरविले होते. महापालिकेच्या नेहरुनगर आणि इतर ठिकाणच्या गोदामातील विनावापराचे सुमारे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे.