दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

0

पिंपरी-चिंचवड : ‘गणपती बाप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक… दोन… तीन… चार…, गणपतीचा जयजयकार’, अशा जयघोषात तसेच ढोल-ताशांच्या दणदणाटात लाडक्या गणरायाला शनिवारी ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शुक्रवारी मोठ्या थाटामाटात घराघरात विराजमान झालेल्या गणरायाची दीड दिवस मनोभावे पूजा-अर्चा झाली. त्यानंतर शनिवारी दुपारी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. शहरातील पिंपरी, काळेवाडी, थेरगाव, सांगवी, वाल्हेकरवाडी, रावेत, मोशी येथील घाटांवर गणपतीच्या विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

ठिकठिकाणी चोख व्यवस्था
महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे जवान विसर्जन घाटावर तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून गणपतीच्या विसर्जनासाठी येणार्‍या नागरिकांना मार्गदर्शन केले जात होते. महापालिकेने प्रत्येक घाटावर घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी हौद तयार केले आहेत. त्याठिकाणी अनेकांनी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले.