पुणे । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील तीन लाख दोन हजार शेतकर्यांनी अर्ज केले आहेत. पैकी एक लाख 51 हजार 714 शेतकर्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. कर्जमाफीसाठी संबंधित शेतकर्यांच्या अर्जांतील माहिती अद्ययावत केली आहे. ही माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे पाठविण्यात आली असून, लाभार्थ्यांची पाचवी यादी मंगळवार (दि.20)पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्जांमध्ये आढळलेल्या त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर संबंधित शेतकर्यांना लाभ मिळू शकेल. छाननीमध्ये पुन्हा अर्जात त्रूट आढळल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेतकर्यांना अपिल करता येणार आहे.
48 हजार शेतकर्यांना कर्जमाफी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) दोन लाख 20 हजार शेतकर्यांची खाती आहेत. कर्जमाफीसाठी बँकेकडे सुमारे 405 कोटी रुपये जमा झाले असून बँकेने रकमेचे वितरण केले आहे. त्यामध्ये 85 हजार शेतकर्यांना प्रोत्साहनपर सुमारे 139 कोटी रुपये देण्यात आले आहेत. 48 हजार शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली असून, त्यांच्या खात्यांमध्ये सुमारे 266 कोटी रुपये जमा झाले आहेत.
लाभार्थी शेतकर्यांच्या चार ग्रीन याद्या
दरम्यान कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर एक लाख 51 हजार 714 अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींमधील माहिती अद्ययावत करून दोन लाख 22 हजार 205 जणांची यादी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली आहे. काही शेतकर्यांची विविध बँकांमध्ये खाती असल्याने ती सर्व माहिती देण्यात आली आहे.जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्यांच्या चार ग्रीन याद्या आल्या आहेत. पाचवी यादी मंगळवार(दि.20) पर्यंत येण्याची शक्यता आहे. असे सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी सांगितले.