कोलकाता । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या पुतळ्याच्या वाद अखेरीस संपला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका गटाने गांगुलीच्या पुतळ्याला विरोध केला होता. मात्र अखेर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्तक्षेपानंतर या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. सौरव गांगुली हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे. यामुळे त्याच्या पुतळ्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत पक्षातील विरोध करणार्यांचा बॅनर्जींनी समाचार घेतला. दक्षिण दिनाजपूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या बैठकीत सौरवच्या पुतळ्याची स्थापना कुठे करायची याबाबत शनीवारी निर्णय घेण्यात येणार आहे.
गंगारामपूर नगरपालिका, बलूरघाट नगरपालिकेमध्ये किंवा बालूरघाटमधील विकास मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार असल्याचे समजत आहे. सौरव गांगुली केवळ पश्चिम बंगालचा नायक नाही, तर संपूर्ण देशाचाही नायक आहे. गांगुलीच्या पुतळ्यावरून जे राजकारण करण्यात आले, त्यामुळे आपण खरोखरच निराश असल्याचे दक्षिण दिनाजपूर स्पोर्ट्स असोसिएशनचे गौतम गोस्वामी यांनी म्हटले.
नक्की काय आहे प्रकरण?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरवचा बेलूरघाटमध्ये लावण्यात आलेला 8 फुटाचा पुतळा राजकारण्यांच्या संघर्षामुळे हटवण्यात आला.