राष्ट्रपतींनी दिली पद व गोपनीयतेची शपथ
हे देखील वाचा
नवी दिल्ली : न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी सोमवारी देशाचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. देवाच्या नावाने त्यांनी इंग्रजीतून शपथ घेत, मावळते सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्याकडून जबाबदारीची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा छोटेखानी समारंभ पार पडला. खेहर हे रविवारी सेवानिवृत्त झाले होते.
गत महिन्यात वरिष्ठ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी मावळते सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी शिफारस केली होती. त्या शिफारशीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. त्यानुसार काल, रविवारी खेहर निवृत्त झाल्यानंतर सोमवारी दीपक मिश्रा यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह निमंत्रितांची उपस्थिती होती.