दीपनगरच्या बोगस भरतीत 9 जण गोत्यात

0

भुसावळ। येथील दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तांत्रिक पदासाठी बोगस भरती झाल्याचे उघडकीस आले असून जुलै 2016 मध्ये भरती झालेल्या या 9 उमेदवारांची कागदपत्रे आक्षेपार्ह आढळली आहेत. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर शासनाची फसवणूक केल्याने 9 व्यक्तींवर भुसावळ तालुका पोलिस स्थानकात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

पीएफ क्रमांकाने बिंग फोडले
या बोगस भरतीत मयत कामगारांचे दोन वारस व सात नवीन कामगारांना रूजू करण्यात आले. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून दिनेश पाटील, अनिल पाटील, उमेश पाटील, हर्षल भामरे, रवींद्र पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, भूषण माळी आणि चंद्रशेखर पाटील यांनी नोकरी मिळविली. त्यांनी भविष्य निर्वाह निधी क्रमांकासाठी परस्पर मुख्य कार्यालयासोबत संपर्क साधल्यामुळे मुख्य कार्यालयाने स्थानिक व्यवस्थापनाला विचारणा केली आणि बनावट कागदपत्रे उघडकीस आली. या उमेदवारांचे रूजू झाल्यापासून पगार निघत नसल्याने चौकशी सुरू झाली होती. चौकशीअंती या नऊ उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्रे आक्षेपार्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विजनिर्मिती प्रशासनाकडून प्राथमिक शहानिशा करण्यात आली. राज्य शासनाच्या मानवसंसाधन विभागाच्यावतीनेदेखील तपासणी सुरू झाली. या तपासणीत या नऊ उमदेवारांनी सादर केलेली कागदपत्रे आक्षेपार्ह आढळली. त्यावरून अशा नोकर्‍या देणारे रॅकेट सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे.