भुसावळ। प्रदूषणासह महागड्या वीज निर्मितीचे कारण देत जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बंद पडलेल्या दीपनगरच्या संच क्रमांक तीनमधून शनिवारी मध्यरात्रीपासून वीज निर्मितीला पूर्ववत सुरूवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओव्हरालिंगच्या कारणास्तव बंद असलेल्या संच क्रमांक पाचही स्वातंत्र्यदिनापासून सुरू होण्याची आशा आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संच क्रमांक तीन बंद करण्यात आला होता अर्थात एमओडी (मेरिट ऑर्डर डिस्पॅच)चे कारण असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. राज्यात पाऊस लांबल्याने व विजेला मागणी वाढल्याने दीपनगरातील संच क्रमांक तीन सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले असून शनिवारी मध्यरात्रीपासून हा संच पूर्ववत सुरू (लाईटअप) करण्यात आला. दीपनगरातील संच क्रमांक पाचही ओव्हरालिंगच्या कारणास्तव बंद आहे.
दोन्ही संच सुरू करण्याच आदेश- राज्यात विजेची मागणी वाढल्याने संच क्रमांक तीन व पाच सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. संच तीन शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झाला असून स्वातंत्र्यदिनापर्यंत संच पाचदेखील सुरू होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांनी दिली.