दीपनगराजवळ भरधाव ट्रकने उडवल्याने दिव्यांग वृद्धाचा जागीच मृत्यू

अपघातानंतर ट्रक सोडून चालकाने काढला पळ : अपघातात बहिण जखमी

भुसावळ : भरधाव ट्रकने स्कुटीला दिलेल्या धडकेत 65 वर्षीय दिव्यांग वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्यांची बहिण जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रक सोडून चालकाने पलायन केले. या अपघातात संतोष निकाळजे (65, झेडटीसी परीसर, भुसावळ) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या भगिनी तथा नर्स सुनीता सोनवणे या जखमी झाल्या. रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
दिव्यांग असलेले निकाळजे हे मुक्ताईनगर येथे बुधवारी दिव्यांगतत्वाचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील नर्स सुनीता सोनवणे हे दोघे स्कुटी (एम.एच.19 डी.टी.2374) ने भुसावळतील झेडटीसी परीसरातील घराकडे निघाले असताना व वळत घेत असतानाच समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रक (सी.जी.04 एच.एस.8740) ने स्कुटीला जबर धडक दिल्याने निकाळजे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या भगिनी सुनीता या जखमी झाल्या. डोळ्यादेखत झालेल्या भावाच्या मृत्यूने त्यांनी हंबरडा फोडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी भेट दिली. दरम्यान, ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून तालुका पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.