भुसावळ : दीपनगर प्रकल्पातील कंत्राटी कर्मचार्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह प्रकल्पाच्या गेटवर आणावा, कर्मचार्यांचे पगार करावेत आदी मागण्यांसाठी बुधवार, 5 रोजी सकाळी दीपनगर गेटवर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान दगडफेक देखील करण्यात आली होती. या प्रकरणी दीपनगरातील सहाय्यक सुरक्षा अधिकारी धनंजय राजेंद्र सोनवणे (32, दीपनगर वसाहत, दीपनगर) यांनी फिर्याद दिल्यावरून भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्यासह आठ संशयीत व अनोळखी जमावाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला तर गुरुवारी गणेश सपकाळे, नरेश बिर्हाडे, सुरज टिंटोरे, संदीप तायडे या चौघांना अटक करण्यात आली.
जमावाला भडकावल्याने दगडफेकीचा आरोप
सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार, 500 मेगावॅट बल्कर गेटवर भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांनी बेकायदा प्रवेश केला व गेट तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तसेच जमावाला भडकावल्यानेच जमावातून कुणीतरी अधिकार्यांवर दगडफेक केली तसेच अधिकार्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी गणेश सपकाळे यांच्यासह शकील शेख, संदीप तायडे उर्फ माया, प्रभाकर जमदाळे, सुरज टिंटोरे, नरेश बिर्हाडे, पवन रोकडे, विशाल वाघमारे व इतर अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत.