दीपनगरात गवताला आग

0

भुसावळ- दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील नवीन क्लबच्या मागील भागात असलेल्या गवताला रविवारी सकाळी आग लागली. दीपनगर केंद्राच्या अग्निमशन बंबाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला, दरम्यान वाढत्या तापमानामुळे गेल्या महिन्याभरात दीपनगरात दुसऱ्यांदा आग लागण्याचा प्रकार घडला आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील नवीन क्लबच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात गवत आहे. उन्हाळ्यात सुकलेल्या या गवताला रविवारी अचानक आग लागली. धुरांचे लोट निघू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. दीपनगर केंद्रातील अग्निशमन विभागाच्या एका बंबांतून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यापूर्वीही यार्डाच्या परिसरात असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. यावेळी देखील चार ते पाच बंबांचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. रविवारी घडलेल्या घटनेत आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यात आले. अन्यथा वाळलेले गवत पेटून परिसरातील इतर भागातही आग वाढण्याची भिती होती. वाढत्या तापमानामुळे दीपनगर केंद्रात आग लागण्याची ही दुसरी घटना असली तरी प्रशासनाकडून आग प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी आर.पी. निकम यांनी दिली.