दीपनगरात प्रहारच्या कामगार संघटनेच्या भुसावळ तालुकाध्यक्षांवर चाकूहल्ला

एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा

भुसावळ : दीपनगर येथील सरगम गेटवर आर्थिक कारणावरून झालेल्या वादानंतर प्रहार कामगार संघटनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष महेश मोहनदास पटेल यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रोजी सायंकाळी उशिरा घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी संशयीत आरोपी संतोष विश्वनाथ भगत याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्ल्याने उडाली खळबळ
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दीपनगर येथील सरगम गेटजवळ मंगळवारी सायंकाळी महेश पटेल व संतोष भगत यांच्यात आर्थिक व्यवहारावरून शाब्दीक वाद झाल्यानंतर भगत यांनी धारदार शस्त्राने पटेल यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूस, कानामागे जखम झाली. हल्ल्यानंतर संशयीत भगत पसार झाला. घटनेची माहिती कळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे धाव घेतली. जखमी पटेल यांच्यावर भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केल्यानंतर डॉ. मयूर चौधरी, डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ.उमेश मुकुंद, डॉ.नजमोद्दीन तडवी, डॉ.शिवाजी भोसले यांनी उपचार केले. संशयीत संतोष विश्वनाथ भगत याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात भादंवि 341, 324, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेत संतोष भगत हेदेखील जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.