दीपनगर कंत्राटदार युनियनच्या अध्यक्षांसह दोघांविरुद्ध गुन्हा

0

टेंडर ओपनिंगप्रसंगी अधिकार्‍यांशी वाद घालत दिली जीवे ठार मारण्याची धमकी ; अंधार्‍यात दीपनगरातील अधिकार्‍यांची ‘लाचखोरीची शाळा’ -फिरोज पठाण यांचा आरोप ; 25 लाखांचे काम पोहोचले 55 लाखांवर

भुसावळ- दीपनगर प्रकल्पातील अधिकारी व ठेकेदारांमधील वाद नवीन नाही त्यातच 55 लाख रुपये किंमतीच्या मजूर पुरवण्याच्या टेंडरवरून अधिकार्‍यांना स्थानिक कंत्राटदार युनियनचे अध्यक्ष फिरोज पठाण यांच्यासह निंभोर्‍याचे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र तायडे यांनी मारहाण करण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तालुका पोलिसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्यांना धमकी देण्यात आली ते अधिकारी समोर न आल्याने सुरक्षा अधिकार्‍यांनी फिर्याद दिली आहे तर या प्रकरणात राजकीय दबाव आल्याची चर्चा रंगली आहे. फिरोज पठाण यांनी मात्र टेंडर प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप केला असून दिवसा प्रक्रिया राबविण्याऐवजी रात्री कार्यालय सुरू ठेवण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्‍न उपस्थित करून अधिकार्‍यांच्या लाचखोरीवरच बोट ठेवले आहे.

अधिकार्‍यांना धमकावल्याने दोघांविरुद्ध गुन्हा
दीपनगर प्रकल्पातील प्रशासकीय ईमारत शक्तीगड कार्यालयात 10 रात्री 7.45 वाजेच्या सुमारास टेंडर ओपनींगसाठी रामचंद्र तायडे व फिरोज पठाण उपस्थित होते. टेंडर ओपनिंगच्या कारणावरून अ‍ॅडीशनल डीवायई खाडे व एक्झीकेटीव्ही इंजिनिअर डी.डी.पिंपळे यांच्याशी तायडे व पठाण यांनी वाद घातला तसेच टेंडर ओपण केल्यास बाहेर भेटा, तुम्हाला जीवे ठार मारू, अशी धमकी देण्यात आली तर रात्री आठ वाजता नितीन पुणेकर आल्यानंतर त्यांनाही टेंडर न उघडण्यासाठी धमकावण्यात आले. याप्रसंगी राजेश तळेले व अमोल बर्‍हाटेदेखील हजर होते. या प्रकरणी वरीष्ठ सुरक्षा व्यवस्थापक राजेंद्र बाबूराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

अंधार्‍यात लाचखोरीची शाळा -फिरोज पठाण
दिवसा टेंडर ओपण करणे गरजेचे असताना रात्री अधिकारी प्रशासकीय ईमारतीत काय होते? असा प्रश्‍न संघटनेचे अध्यक्ष फिरोज पठाण यांनी उपस्थित करून आपण टेंडरला एक्स्टेन्शन द्यावे, अशी मागणी सकाळीच निवेदनाद्वारे केली होती व सायंकाळी तुम्हाला कळवू, असे अधिकार्‍यांनी सांगितल्याने आपण माहिती घेण्यासाठी सायंकाळी गेलो होतो. यावेळी खाडे यांनी आजचे सीई चंद्रकांत थोटवे असून वरीष्ठांना पैसे द्यावे लागतात, हे तुम्हालाच माहित असल्याचे ते म्हणाल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.

चेंबरीच्या कामात नियम धाब्यावर ?
दीपनगर प्रकल्पात चेंबरीच्या (विश्रामगृह) कामासाठी 55 लाखांचे टेंडर काढण्यात आले आहे त्यानुसार दोन वर्षांसाठी मजूर पुरवण्यात येणार आहे मात्र फिरोज पठाण यांच्या आरोपानुसार या कामासाठी हल्लीच्या ठेकेदाराने नियमच धाब्यावर बसवले आहेत. 25 लाखांचे काम 55 लाखांवर नेण्यात आले असून प्रत्यक्षात दोन ते तीन मजूर काम करतात शिवाय खाण कामाचे कुणाकडे प्रशिक्षण असलेले प्रमाणपत्र नाही, महिला रात्रीदेखील येथे काम करतात मात्र या नियमांकडे वरीष्ठ अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, दीपनगरातील अनागोंदीबाबत वरीष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी व दोषी अधिकार्‍यांसह संबंधितांविरुद्ध कारवाई होण्यासाठी लोकप्रतिनिधींसह वरीष्ठ अधिकारी दखल घेतील का ? हा खरा प्रश्‍न आहे.