भुसावळ । येथील दीपनगर विज केंद्रातून नियमित हजारो टन फ्लाय अॅशची निर्मिती होत असते आणि ते नियमितपणे एम.एम.आय धारक ब्रिक्स कंपन्या तसेच नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट कंपनी हजारो टन राखेची उचल करीत आहे. एम.एम.आय धारकांना 50 रुपये मेट्रीक टन तसेच ओरिएंट सिमेंट कंपनीला 193 रुपये टनाप्रमाणे उचल करण्याचे करार असताना येथे चार महिन्यांपासून काही वरिष्ठ अधिकार्यांच्या संगनमताने 170 रुपये प्रती मेट्रीक टनप्रमाणे फ्लाय अॅशची उचल केली जात असल्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दीपनगर येथे आमरण उपोषणास महाराष्ट्र दिनापासून सुरुवात करण्यात आली आहे.
राखेच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांवाढ करण्याचा निकष
राज्य शासनाच्या नविन धोरणामुळे फ्लॉय अॅशपासून ब्रिक्स बनवून ती सार्वजनिक बांधकाम तसेच खाजगी बांधकाम कंपन्यांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे विटा बनविण्यासाठी या राखेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. दरवर्षी राखेच्या किंमतीमध्ये 10 टक्यांनी वाढ करण्याचा निकष आहे. त्यामुळे सद्य स्थितीत हि किंमत 193 रुपये प्रती मेट्रीक टन करण्यात आली आहे.
170 रुपये मेट्रीक टनाप्रमाणे विक्री
पावसाळ्यात येथील विज केंद्र बंद असल्यामुळे ओरिएंट कंपनीने पारस विज केंद्रातून 730 रुपये तर बुटीबोरी येथून 1350 रुपये ऊकाई येथून 1400 रुपये टनाप्रमाणे राखेची वाहतुक करुन ओरिएंटने त्यांच्या राखेची मागणी पुर्ण केली होती. मात्र गेल्या चार महिन्यात राखेची किंमत वाढविण्याऐवजी ती 170 रुपये मेट्रीक टन करण्यात आली.
यांचा आहे सहभाग
नाशिक विभागात सिमेंट कंपनी नसताना देखील तेथे राखेचे मुल्य 350 रुपये मेट्रीक टन आहे. मात्र याठिकाणी 170 रुपयात विक्री केली जात असून शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंदर्भात प्रशासनास निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र यावर कारवाई न झाल्यामुळे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र दिनापासून विद्युत केंद्राच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणात रामचंद्र तायडे, ज्ञानदेव कोळी, जयवंत कोळी यांचा सहभाग आहे.