दीपनगर प्रकल्पात कंडारीच्या कंत्राटी कामगाराची आत्महत्या

0

भुसावळ : कंडारी येथील रहिवासी व दीपनगर प्रकल्पातील 52 वर्षीय कंत्राटी कामगाराने दीपनगर औष्णिक प्रकल्पातील हायड्रोजन प्लाँटमध्ये आत्महत्या केल्याची घटना 15 रोजी दुपारी दोन ते रात्री 9.20 वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भरत बाजीराव तायडे (52, महादेव टेकडी परीसर, कंडारी) असे मयत कंत्राटी कामगाराचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत गौतम तानू कदम यांनी खबर दिल्यावरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भरत तायडे ते दुपारी दोन ते दहा वाजेच्या ड्युटीसाठी जात असल्याचे सांगून रविवारी घरातून निघाले. यावेळी त्यांच्या मुलीने त्यांना वारंवार मोबाईल लावल्यानंतरही ते भ्रमणध्वनी उचलत नसल्याने गौतम कदम यांना याबाबत कल्पना देण्यात आल्यानंतर ते रात्री ड्युटीवर आल्यानंतर त्यांना भरत तायडे यांनी प्रकल्पात सुती दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोमवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परीवार आहे. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शामकुमार मोरे करीत आहेत.