दीपन चक्रवर्तीला विजेतेपद

0

अहमदाबाद । रेल्वेचा ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्तीने शेवटच्या, 12 व्या फेरीत मोठी उलथापालथ करत 55 व्या राष्ट्रीय चॅलेजर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. शेवटच्या फेरीत निर्णायक विजय मिळवणार्‍या दीपनचे सिनियर गटातील हे पहिलेच राष्ट्रीय विजेतेपद आहे.अकराव्या फेरीअखेर स्वप्निल धोपाडे 10 गुण आणि दीपन 9.5 गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर होते. स्पर्धेचे अव्वल स्थान मिळवण्यासाठी स्वप्निलला शेवटची फेरी बरोबरीत राखायची होती. त्यामुळे या फेरीत स्वप्निल बचावात्मक खेळ केला खरा, पण त्यामुळे त्याचा फायदा व्हायच्या ऐवजी नुकसानच झाले. दीपनने 10.5 गुणांसह बाजी मारली. दीपनच्या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने शेवटच्या पाचही फेर्‍यांमध्ये विजय मिळवले. दुसरीकडे स्वप्निलला शेवटच्या पाच लढतींमध्ये केवळ एक विजय मिळवता आला आणि इतर सामने त्याला बरोबरीत राखावे लागले.

त्याची ही कामगिरी त्याला निर्भेळ यश देऊ शकली नाही. शेवटच्या फेरीचा अपवाद वगळता इतरवेळी मात्र स्वप्निलने प्रतीस्पर्ध्यांना डोके वर काढण्याची संधी मिळू दिली नाही. स्पर्धेतील तीसरा क्रमांकही रेल्वेच्या बुद्धिबळपटूने पटकावला. हिमांशु शर्माने शेवटच्या फेरीत एलआयसीचा ग्रॅण्डमास्टर श्रीराम झावर विजय मिळवत 9.5 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

स्पर्धेतील अंतिम निकाल :
दीपन चक्रवर्ती (रेल्वे), स्वप्निल धोपडे (रेल्वे), हिमांशु शर्मा (रेल्वे), देवाशिष दास (ओदिशा), रोहित ललित बाबू (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), अभिजीत कूंटे (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड), एसएल नारायण (केरळ), एस नितीन रेल्वे), आर. आर. लक्श्मण (रेल्वे).