दीपस्तंभ व्याख्यान मालेचा एरंडोलला सामारोप

1

आयुष्यातील मार्गावर येणार्‍या दुःख तुडवूनच सुखाचा मार्ग मिळतो –

व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

एरंडोल : आयुष्यात येणार्‍या प्रत्येक अडचणी व दुःखामुळेच सुखाकडे जाण्याचा मार्ग मिळत असतो, दुःख हे सुखाकडे जाण्याची संधी असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सकाळ माध्यम समुहाचे माजी मुख्य संपादक उत्तम कांबळे यांनी केले. आर्यन फाउंडेशन, दीपस्तंभ फाउंडेशन, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, विवेकानंद केंद्र व राठी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दीपस्तंभ व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी वाट तुडवतांना या विषयावर ते बोलत होते. प्रा.सुरेश पांडे अध्यक्षस्थानी होते.

माणुस बिघडवणारे कार्यक्रम रोज होतात – कांबळे
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी पहिले पाऊल टाकले की वाटेचा जन्म होत असल्याचे सांगितले. चालतचालत गेले की वाट वाढत जाते. चालणार्‍या व्यक्तीने स्वतः वाट तयार करावी. वाट उसनवारीने घेऊ नये असे सांगितले. निसर्ग माणसाला भरभरून देतो. मात्र कोणत्याही सजीव व्यक्तीला चालण्यासाठी निसर्ग वाट देत नाही. त्यामुळे स्वतः वाट निर्माण करून ध्येय प्राप्त करावे. सद्यस्थितीत माणुस बिघडवणारे कार्यक्रम रोज होतात. व्याख्यान मालेतून माणूस घडविण्याचा कार्यक्रम होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्याख्यान मालेचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. दुःख अशिक्षितपणामुळे निर्माण होते तर शिक्षणामुळे दुःख संपत असते.म्हणुन सर्वांनी साक्षर होणे गरजेचे आहे. कष्टाची लाज बाळगणारे आयुष्यात अडचणीत सापडतात. त्यासाठी प्रत्येकाने कष्ट करण्याची तयारी ठेवावी.आयुष्य प्रत्येक वळणावर परीक्षा घेत असते. संकट लढण्याची ताकद देत असते. मानवी जीवनातील दुःख जादूटोण्याने व अंधश्रधेने संपत नाही तर त्यावर मार्ग शोधून काढल्यामुळे संपत असते. बालपणी आयुष्यात अनेक संकटे आलीत मात्र अंधश्रध्धेचा गतिरोधक ओलांडून व आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करून मी जीवनात यशस्वी झालो. असे त्यांनी सांगितले. आईसाठी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले. आई व मी अंधश्रद्धेमुळे जगण्यासाठी वाट तुडवत होतो, ध्येय प्राप्त करायचे असेल तर शिडीचा वापर न करता थेट उडी मारा. यश निश्चित मिळेल असे सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
दीपस्तंभचे संचालक प्रा.यजुवेन्द्र महाजन यांनी प्रास्ताविक केले. गायत्री चौधरी यांनी सुत्रसंचलन केले. वैष्णवी कुलकर्णी या विद्यार्थिनीने मान पत्राचे वाचन केले. प्रज्ञाचक्षु (अंध शिक्षक) राजेंद्र चव्हाण यांनी श्री. कांबळे यांचा परिचय करून दिला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, जेष्ठ नागरिक मधुकर दुबे यांचा दीपस्तंभच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ.रेखा महाजन, डॉ.रवी महाजन, डॉ.नितीन राठी, सुमती पाटील, सुमती महाजन, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, जयश्री पाटील, विक्रीकर निरीक्षक भारती पाटील यांचेसह महिला व पुरुष युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.