‘कितीही विरोध झाला तरीही ‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच’, असे ठणकावून सांगणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या या चित्रपटामुळे वादाच्या भोवर्यात अडकली आहे. कोणी तिला शूपर्णखेप्रमाणे नाक कापण्याची धमकी देत आहे, तर तिला जिवंत जाळण्यासाठी कोटीचे बक्षीस जाहीर केले जात आहे. या सर्व वातावरणावर सरकारने कोणतीच भूमिका घेतली नसून, इतक्या गंभीर मुद्द्यावर सरकार मौन का पाळत आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. याच पार्श्वभूमीवर दीपिकाने ‘ग्लोबल आंत्रपुनर्शिप समिट’ कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
पण, दीपिकाने मात्र सरकारने या प्रकरणात लक्ष न घातल्यामुळे या रोषापोटीच कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. ‘ग्लोबल आंत्रपुनर्शिप समिट’ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांकासुद्धा हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाशी संबंधित एका व्यक्तीने माध्यमांना ही माहिती दिली. या संमेलनात दीपिका ‘हॉलिवूड टू नॉलिवूड टू बॉलिवूड: द पाथ टू मूव्हिमेकिंग’ या सेशनमध्ये भाषणही करणार होती. पण, तिने या कार्यक्रमालाच जाण्यास नकार दिल्याने आयोजकांपुढेही मोठा पेच उभा राहिला आहे.