भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठाच्या उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष
भुसावळ- शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या-वस्त्यात दीपोत्सवात फराळ, कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. दात्यांकडून वाटी-वाटी फराळ व सुस्थितीतील कपडे आणि शालेय साहित्य गोळा करून गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्या ठिकाणी दिवाळी साजरी करायची, असा हा उपक्रम आहे. यंदा त्याचे तृतीय वर्ष आहे. समाचाचेही आपण काही देणं लागतो या भावनेतून प्रतिष्ठानने सन 2016 मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोेवली. पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, भुसावळ तालुक्यातील तापी नदीच्या काठावरील वस्ती, दुसर्या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे हा उपक्रम राबवण्यात आला. शहरवासीयांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरुप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केला आहे.
नवे कपडे दान देण्याचे आवाहन
दात्यांनी शक्यतोवर नवे कपडे दान द्यावे. ज्यांना शक्य नसेल पण देण्याचं सुख अनुभवायचं असेल त्यांनी जुने कपडे स्वच्छ धुवून व इस्त्री करून द्यावे. फराळ द्यायचा असेल तर उपक्रम राबवणार्या समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्पप्रमुख जीवन महाजन तर समन्वयक भूषण झोपे हे आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील, ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, शैलेेंद्र महाजन, प्रमोद पाटील, प्रा. श्याम दुसाने, देव सरकटे, अमित चौधरी, संदीप सपकाळे यांचाही प्रकल्प समितीत समावेश आहे.
जुने, नवे कपडे गोळा करणार
गेल्या वर्षी या उपक्रमात फराळासह जुने व नवे कपडे गोळा करण्यात आले. ते जवळपास 200 जणांना दिवाळीत वाटप करण्यात आले. यंदा या उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर, ब्लँकेट असतील ते देण्यासाठी प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.