जुन्नर/आळेफाटा : भरधाव स्विफ्ट कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाच्या लोखंडी कठड्यास जाऊन धडकली. त्यामुळे समोरच्या बाजूने कारने अचानक पेट घेतला. पाहाता पाहाता संपूर्ण कार पेटल्याने आग चांगलीच भडकली. त्यातच कारचे दरवाजे उघडता न आल्याने आत बसलेल्या चालकासह तिघांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावाजवळील सातकर मळा येथे रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. दिलीप चंद्रराव नवले (45, रा. बाभुळवाडी, ता. पारनेर), नरेश सखाराम वाघ (42, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), प्रशांत सुरेश चासकर (23, रा. चासकर मळा, वडगाव आनंद, ता. जुन्नर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. आग लागल्यानंतर कार आतून कशी काय लॉक झाली, याबाबत घटनास्थळी शंकाकुशंका व्यक्त होत होत्या. आळेफाटा पोलिस या घटनेचा सखोल तपास करत होते.
आगीनंतर कार आतून लॉक झाली?
पोलिसांच्या माहितीनुसार, एमएच 14, डीएक्स 1231 या स्विफ्ट डिझायनर कारने नगर-कल्याण महामार्गावरील आळेफाटा येथून वडगाव आनंदकडे प्रशांत उर्फ बंटी चासकर, नरेश वाघ, दिलीप नवले हे जात होते. कार भरधाव असल्याने चालकाला ती नियंत्रित करता आली नाही व ही कार पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकली. त्यामुळे अचानक कारने पेट घेतला. वाघ व नवले हे बंटी चासकर याला घरी सोडण्यासाठी जात होते, असेही सांगण्यात आले. कारने पेट घेतल्यानंतर कारचे दरवाजे आतील बाजूने लॉक झाल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे तिघांनाही बाहेर पडला आले नाही. त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. नवले व वाघ हे ओतूर येथील रहिवासी असून, ते औषधीविक्रेते होते. तर चासकर हे हॉटेल व्यावसायिक आहेत. या घटनेनंतर महामार्गाने जाणारे-येणार्यांसह स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. बेशुद्धावस्थेतील तिघांनाही नजीकच्या दवाखान्यात हलविण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ही आग धडकेनंतर झालेल्या शॉर्टसर्किटने लागली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तथापि, राज्य परिवहन विभागाच्या अधिकार्यांकडून वाहनाची तपासणी करून घेतली जाईल, असेही पोलिस म्हणाले.
तिघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
आग लागल्याची माहिती आळेफाटा पोलिसांना कळताच, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गाडीवर पाणी फेकून विझविण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत होते. नागरिकांनी गाडीत अडकलेल्या तिघांना ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, बेशुद्धावस्थेत व होरपळलेल्या अवस्थेत त्यांना बाहेर काढले गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत. आगीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी विभागीय परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाकडे विनंती करण्यात येणार असून, त्यादृष्टीने आरटीओशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. या घटनेने वडगाव आनंदमध्ये एकच खळबळ उडाली होती. मृतकांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.