चाळीसगाव । येथील भडगाव रोडवरील एल.आय.सी. ऑफीसच्या बाजुला असलेल्या दुकानांच्या समोरील गटार खोदल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने मंगळवार ७ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जवळपास ८ व्यवसायीकांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना जाब विचारून गटारीमध्ये पाईप टाका अन्यथा बांधकाम करा यासाठी नगरपालिकेच्या मुख्य गेट वर कपडा काढो आंदोलन केले. त्यानंतर नगरसेवक व विरोधी नगरसेवकामध्ये व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याने मुख्याधिकारी यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या २ ते ३ महीन्यापासून नोंटबंदीमुळे सर्वसामान्य मानसांसह व्यापारी कमालीचा अडचणीत सापडला असून छोटे व्यापारी व दुकानदारांना याचा जबर फटका बसला आहे. नोटबंदी उठल्यानंतर जेम-तेम कामधंद्याची लाईन लागत असतांना येथील भडगाव रोड वरील एल.आय.सी.ऑफीसच्या बाजुला असलेल्या जवळपास ६ ते ७ दुकानांसमोर नगरपालिकेच्या वतीने ३ फेब्रुवारी २०१७ रोजी नाला खोदल्याने या दुकानामध्ये व ऑटो गॅरेजमध्ये गिर्हाईक येणे जवळपास बंद झाल्याने या दुकानदारांवर व तेथे काम करणार्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून शशिकांत भामरे, जिभाऊ नामदेव पाटील, खुशाल पाटील, संजय पवार, मंगेश महाजन, संजय कुलकर्णी, रविंद्र पाटील या दुकानदारांनी सनदशिर मार्गाने ०६ फेब्रुवारी २०१७ रोजी मुख्याधिकारी नगरपालिका चाळीसगाव यांना त्यांच्या दुकानासमोरील गटारीचे बांधकाम करणेबाबत अर्ज दिला होता. त्यावर काही कारवाई न झाल्याने यातील काही दुकानदार मंगळवार ७ रोजी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन आमच्या दुकानासमोरील गटार दुरूस्त करा असे सांगितले. मात्र मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालिंसग यांनी याबाबत मला काही माहीत नाही, असे सांगितल्यावर आंदोलकांनी लागलीच खाली येऊन नगरपालिकेच्या मुख्य दरवाज्याजवळ अंगातील शर्ट काढून ‘कपडा काढो आंदोलन’ केले.
दुकानदारांनी घेतला मागणीसाठी पवित्रा
जोपर्यंन्त आमची मागणी पुर्ण होत नाही तोपर्यंन्त आम्ही येथून उठणार नाही. यावर काही कर्मचार्यांनी विनंती केली असता, यातील आंदोलकाने आमच्यावर दबाव आणल्यास येथेच आत्मदहन करू असा इशारा दिला. काही वेळात नगरपालिकेचे नगरसेवक दिपक पाटील त्याठिकाणी आलेत व मागण्या ऐकून घेतल्या. थोड्या वेळात न.पा.चे गटनेते राजेंद्र चौधरी व नगरसेवक तथा आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील, मानसिंग राजपूत हे न.पा.च्या गेट वर पोहचले त्यावेळी घृष्णेश्वर पाटील यांनी यावर तोडगा काढायचा असेल तर आपण एका जागेवर बसून म्हणणे ऐकून निर्णय घेऊ असे सांगितले. तर राजेंद्र चौधरी यांना आंदोलकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी राजेंद्र चौधरी यांना आपण गटारीची कुठलीही वर्क ऑर्डर नसतांना गटार खोदून दुकानदारांचे नुकसान केले आहे असे म्हटल्यावर राजेंद्र चौधरी व गणेश पवार यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. थोड्याच वेळात तेथे उभे असलेले नगरसेवक दिपक पाटील यांनी राजेंद्र चौधरी यांना तुम्ही अरेरावची भाषा करू नका, याठिकाणी उभे असलेले वयस्कर व्यक्तीला तुम्ही आरेकारे करीत आहात असे सांगताच दोघांमध्ये पुन्हा जोरदार शाब्दीक चकमक झाली. हा सर्व प्रकार जवळपास तासभर सुरू होता त्यामुळे आतले कर्मचारी आतमध्ये तर नागरीक व काही कर्मचारी बाहेर ताटकळत उभे होते. अचानक पोलीस ताफा त्याठिकाणी आला व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले. राजेंद्र चौधरी व घृष्णेश्वर पाटील यांनी त्याठिकाणी पाईप लवकरच बसवू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक तेथून निघून गेलेत.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालिंसग यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे कि, ७ फेब्रुवारी २०१७ रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात 11:30 वाजता भानुदास मराठे (भावडू), खुशाल पाटील, गणेश पवार व इतर 4 ते 5 जण आलेत व त्यांनी अरेरावीची भाषा आणि उर्मटपणाची भाषा वापरून दालनातून निघून गेले व नगरपालिकेचे मुख्यगेट बंद करून त्याठिकाणी बसले येणारे-जाणारे कर्मचारी व नागरीकांचा रस्ता अडवून ठेवला. कर्मचा-यांना आत मध्ये कोंडून ठेवले. सरकारी कामात अडथळा आणून अंगावरील कपडे काढून लजास्पद वर्तन केले असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा व कलम ३७ (१) (३) चे उल्लघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सहाय्यक फौजदार संजय पंजे करीत आहेत.
भडगाव रोडवरील एल.आय.सी.ऑफीस च्या बाजुला असलेल्या दुकानांसमोर गटारीची मोठी चारी खोदल्याने या दुकानदारांच्या धंद्यावर परिणाम होऊन त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी ७ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिका-यांना ही माहीती सांगितली व सनदशिर मार्गाने मुख्यप्रवेश द्वारा जवळ अर्धनग्न आंदोलन केले. त्याठिकाणी गटनेते राजेंद्र चौधरी यांनी येवून सनदशिर मार्गाने सुरू असलेले आंदोलन अरेरावीची भाषा वापरून व पोलीसांना बोलवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याने या आंदोलनाला मी रयत सेनेचा पाठींबा दिला व स्वत: आंदोलनात सहभागी झालो याचा राग येऊन राजेंद्र चौधरी व नगरपालिकेने आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले आहेत हे चुकीचे असून यापुढे कोणावर अन्याय झाल्यास त्याने आंदोलन करू नये का? झालेल्या घटनेची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत.
– गणेश पवार, अध्यक्ष रयत सेना
दुकानदारांना कुठलीहि सुचना न देता व अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक यांना विश्वासात न घेता नगरपालिकेत मनमानी पध्दतीने कारभार सुरू आहे. दुकानासमोर अचानकपणे खड्डे खोदल्याने दुकानदारांचा रोजगार बुडत असून त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. काही नगरसेवक श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत अधिकारी सांगतात आम्हाला याची काही माहीती नाही हे चुकीचे आहे. तातडीने हे काम मार्गी लागले पाहीजे. अशाच पध्दतीने नगरपालिकेत मनमानी कारभार सुरू राहील्यास सर्व सामान्य नागरिकांसाठी आघाडीचे सर्व नगरसेवक रस्त्यावर उतरून आंदोलन करू. नगरपालिकेच्या इतिहासात न.पा. चे गेट कधीच बंद झाले नव्हते मात्र २ महीन्यातच अशी घटना घडल्याने ही लाजीरवानी बाब आहे.
– दीपक पाटील, नगरसेवक