मुंबई : करोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज आदेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमधील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढ कमी होत नाही. त्या जिल्ह्यात मात्र हे निर्बंध असेच राहतील. त्यामुळे काही गोष्टींमध्ये शिथिलता जिथे करणं शक्य आहे, तिथे आम्ही करतो आहोत. जिथे करणं थोडसं अवघड आहे, तिथल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, माझ्यासमोर माझ्या नागरिकांच्या जीवाची चिंता आहे. जीव वाचविण्यासाठी जेव्हा धावपळ करावी लागते. राज्यात 1250 ते 1300 मेट्रीक टन ऑक्सिजन आपण उत्पादीत करू शकतो. जेव्हा दुसऱ्या लाटेत पीक गाठलं होतं, तेव्हा 1700 मेट्रीक टन ऑक्सिजन लागत होता. म्हणजे, 500 मेट्रीक टन ऑक्सिजन आपल्याला लागत होता. हे आणणं खूप कठीण होतं, इथे कोणी मदतीला येत नाही. मी व्यापाऱ्यांच दु:ख, वेदना समजू शकतो, पण त्यावेळेला कुठलंही ऑक्सिजनचं दुकान उघडं नव्हतं. म्हणून मला ही काळजी घ्यावी लागते. नागरिकांचे जीव वाचवणं हे महत्त्वाच आहे, त्यामुळे मला ही काळजी घ्यावी लागते. पुढच्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा दुप्पटीने ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कोविड नियमांचं पालन बंधनकारक आहे. आज आपण एक आदेश काढत आहोत, दुकानाच्या वेळा रात्री 8 पर्यंत करणार आहोत. मात्र, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत नाही, तिथं रुग्णसंख्या जास्त आहे, तिथं पूर्वीचेच नियम व बंधन लागू राहतील, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.