दुकानाबाहेरच्या अनधिकृत फलकांवर होणार कारवाई

0

आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आदेश

पुणे – शहरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या बाहेर नियम डावलून लावलेल्या नामफलकांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पंधरा क्षेत्रिय आयुक्तांना हे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश दुकानाच्या बाहेर नामफलक लावताना अनेक व्यावसायिकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने हे आदेश काढले आहेत.
नामफलकांची परवानगी देण्याचे अधिकार संबधित क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. दुकानदारांना व्यवसायाची माहिती देण्यासाठी जाहिरातीमध्ये स्कायचिन्हाचा वापर करायचा असेल आणि ही जागा मालकीची, भाडे तत्त्वावर घेतलेली असेल तर किरकोळ जाहिरातीसाठी आयुक्तांची मान्यता घेण्याची, शुल्कही भरण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारचे परिपत्रक आहे.

दर्शनी भागात फलकांना विनाशुल्क परवानगी
व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दुकानाच्या लांबी एवढाच लांब फलक लावता येणार आहे. तसेच त्याची उंची तीन मीटरपेक्षा उंच असता कामा नये. अशा पद्धतीचा एकच फलक दुकानाच्या दर्शनी भागात विनाशुल्क लावण्याची परवानगी असणार आहे. या व्यक्तिरिक्त दुकानदारांना इतर ठिकाणी फलक लावायचे झाल्यास त्यासाठीचा अर्ज घेऊन त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडून पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. उर्वरित दुकानांची माहिती देणार्‍या सर्व जाहिरात फलकांवर कारवाई करून ते काढून टाकावेत, असे आयुक्त कुमार यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. या कारवाईचा लेखी अहवाल तातडीने आकाशचिन्ह विभागामार्फत आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उंच व मोठ्या आकाराचे फलक
मात्र याचा योग्य तो अर्थ पालिकेच्या क्षेत्रिय आयुक्तांनी न लावल्याने नियम डावलून अनेक दुकानदारांनी उंच आणि मोठ्या आकाराचे दुकानांची माहिती देणारे जाहिरात फलक लावले असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून तसेच विविध स्तरातून पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. याची शहानिशा केल्यानंतर यामध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेकायदा आणि चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या दुकानांच्या नामफलकांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी पंधरा क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत.