दुकानाबाहेरून उठवल्याने वृद्धाच्या डोक्यात बाटली मारली

0

भुसावळातील घटना ; सोशल मिडीयावर अफवांचे पेव ; दोघा आरोपींना अटक

भुसावळ- शहरातील आठवडे बाजार भागातील अप्सरा चौकाजवळील न्यू वैशाली प्रोव्हीजनबाहेर बसलेल्या तरुणांच्या टोळक्याला दुकानदाराने उठावयास सांगितल्याने मद्यधूंद तरुणांनी 67 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात सोडा वॉटरची बॉटल मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सोशल मिडीयावर मात्र शहरात गोळीबार झाल्याच्या अफवांचे पेव फुटले. मारहाणीनंतर तिघा तरुणांचे टोळके पसार झाले. समजलेल्या माहितीनुसार, अप्सरा चौकातील न्यू वैशाली प्रोव्हीजनबाहेर तीन तरुण बसले असताना सुधीर दत्तात्रय वाणी (67, शनी मंदिर वॉर्ड) यांनी त्यांना दुकानाच्या रस्त्यात बसले असल्याने उठावयास सांगितले असता संशयीत आरोपी शफिक शुभराती गवळी (21, ताज नगर, नसरवांजी फाईल, भुसावळ) व आदिल अलियार तडवी (32, नसरवांजी फाईल, भुसावळ) यांनी त्यांच्याशी वाद घालून एकाने सोडा वॉटरच्या गाडीवरील एक बाटली वाणी यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या घटनेत त्यांच्या डोक्याला तीन ते चार टाके पडले. वाणी यांनी या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली असन रात्री उशिरा आरोपींना अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.