धुळे । शहरातील गोळीबार टेकडी परिसरात चोरट्यांनी कापड दुकान फोडून तब्बल 60 हजाराच्या साड्या आणि इतर कपडे चोरुन नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दोन दिवसापुर्वीच शहरातील आग्रारोडवर महिलांनी 22 शर्ट चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली होती. आता कापड दुकान फोडल्याच्या या ताज्या घटनेने चोरट्यांनी कापड दुकानांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे.
टॉमीच्या सहाय्याने उचकटले शटर
शहरातील गोळीबार टेकडी परिसरात असलेल्या पोलिस क्लब समोर श्रीराज अपार्टमेंटखाली याच अमार्टमेंटमध्ये राहणार्या सम्राट अशोक बोरसे यांच्या मालकीचे साडी कपडे विक्रीचे शिवशक्ती गारमेंटस नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शेटर उचकवून चोरी करण्यात आली. हा प्रकार आज बुधवारी सकाळी 7 वाजेनंतर उघडकीस आला. दुकान मालक सम्राट बोरसे यांनी तत्काळ याची माहिती शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अशी घडली घटना
अज्ञात चोरट्याने काल मध्यरात्री नंतर या ठिकाणी दुकानाचे शेटर टॉमीच्या सहाय्याने उचकवून आत प्रवेश करीत दुकानातून 50 ते 60 हजार रुपये किंमतीच्या पैठणी, जसदोसी, शिफॉन, जार्जेट, चायना, लक्ष्मीपती आदी प्रकाराच्या साड्या तसेच जिन्स पॅन्ट चोरुन नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन नोंद करुन घेत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.