दुखापतीवर मात करून रोहितची सरावाला सुरूवात

0

मुंबई : भारतीय संघाचा धडाडीचा फलंदाज आणि ‘हिट मॅन’ अशी ओळख असणाऱ्या रोहित शर्माने सरावाला सुरूवात केली आहे. ट्विट करून रोहितने फलंदाजी करतानाची काही छायाचित्र अपलोड केली आहेत. यात आपल्याला रोहित फलंदाजीचा प्राथमिक सराव करताना दिसून येतो. रोहितच्या मांडीवर सर्जरी करण्यात आली होती. लंडनमध्ये रोहित शर्मावर उपचार सुरू होते. दुखापतीमुळे रोहितला मैदानापासून दूर रहावे लागले. यशस्वी शस्त्रक्रीयेनंतर रोहितने आता मैदानात सरावासाठी उतरला आहे. नेटमध्ये फलंदाजी केल्यानंतर आता मी खऱ्या अर्थाने पूर्ण झालो असल्याचे भावनिक ट्विट रोहितने केले आहे.

तंदुरूस्त होऊन करणार पुनरागमन

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत शेवटच्या वन डेत रोहित शर्माला दुखापत झाली होती. दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला सर्जरीसाठी लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुखापतीमुळे रोहितला इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेसाठी मुकावे लागले. सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. पण रोहित अद्याप पूर्णपणे सावरलेला नसल्याने त्याचा संघात इतक्यात समावेश करण्यात आलेला नाही. येत्या २३ फेब्रुवारीपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जाणार असून तोपर्यंत रोहित पूर्णपणे तंदुरूस्त होऊन संघात पुनरागमन करेल, अशी आशा रोहितच्या चाहत्यांना आहे. रोहितच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ सध्या सलामीवीर फलंदाजासाठी पेचात सापडलेला दिसून आला. ट्वेन्टी-२० सामन्यात तर खुद्द कर्णधार कोहलीला सलामीसाठी फलंदाजीला उतरावे लागले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला की, भारतीय संघात लवकरात लवकर पुनरागमन करण्याचा माझा प्रयत्न आहे. दुखापतीतून सावरण्यसाठी नेमका कालावधी मी सांगू शकत नसलो तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठीचे लक्ष्य ठेवून प्रयत्न करणार आहे.