दुखावलेली मनसे, सुस्त शिवसेना

0

नोटाबंदी, जीएसटी अशा आर्थिक विषयाभोवती सध्या सारे राजकारण एकवटले आहे. नोटाबंदी समर्थनासाठी भाजपने पुण्यात सह्यांची मोहीम राबविली. त्यातील मुख्य उपक्रम संभाजी महाराज उद्यानासमोर राबविला. त्यात भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सामील झाले होते. तेथील गर्दीची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. भाजपने पुणेकरांचा मूड तपासावा एवढे मात्र यानिमित्ताने म्हणता येईल.

बेरोजगारी, मंदी अशा समस्यांभोवती पुण्याचे जनजीवन ग्रासलेपणाने फिरते आहे. असंघटीत वर्ग आणि गरीब लोक अधिकाधिक खाईत लोटले जात आहेत. याकडे माध्यमांचेही फारसे लक्ष नाही, त्यामुळे सत्ताधारी कानाडोळा करीत आहेत. समाजजीवनात याप्रकारच्या घडामोडी घडत असताना आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने फेरीवाल्यांविरूध्द आंदोलन केले. परप्रांतीय फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलनाबद्दल मतमतांतरे निश्‍चितच आहेत. तरीही फेरीवाल्यांवर अचानक धावून जाऊन त्यांच्या मालाची नासधूस करण्यात आली याचे समर्थन करता येणार नाही. या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांवर पोलिस खात्याने कारवाई केली. यात लावलेल्या दरोड्याच्या गुन्ह्याबाबत मनसे दुखावली गेली आहे. या कलमाखाली होणार्‍या शिक्षा मोठ्या आहेत. हे कलम कार्यकर्त्यांचे करीअर धोक्यात आणणारे आहे. ते कलम काढावे यासाठी मनसेची धडपड चालू आहे. मनसेची ही धडपड एकाकी राहू नये असे वाटते. विरोधी पक्षाच्या आंदोलनात पोलिस खात्यामार्फत कशी कलमे लावली जातात याचा अनुभव भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. अन्य पक्षातही आंदोलन त्यानंतरची कोर्टबाजी याला सामोरे गेलेले नेते आहेतच. त्यांनी मनसेच्या मागणीत लक्ष घालायला हवे. मनसेने पालकमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.

नोटाबंदी आंदोलन, फेरीवाला आंदोलन हे रस्त्यावरील राजकारण झाले. पक्षांतर्गत राजकारणात पाहायचे झाले तर शिवसेना पुण्यात तरी ठप्प आहे. पक्षाचे शहरप्रमुख पद विनायक निम्हण यांच्या राजीनाम्याने बरेच दिवस रिक्त आहे. या पदासाठी माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे यांची नावे घेतली जातात पण त्यावर निर्णय झालेला नाही. संपर्कप्रमुख नेमले असले तरी सेना पुण्यात आक्रमक झालेली नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी पुण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे असे नेहमी वाटते. पुण्यात शिवसेनेची डरकाळी घुमावी, असे ठाकरेंनाही वाटते. याकरीता त्यांनीच पुण्यासाठी वेळ काढायला हवा. वेगवेगळे विषय शिवसेना हाती घेते पण अखेरीस फायदा दुसराच पक्ष घेऊन जातो, असे पुण्यात घडते. लालमहाल आंदोलन हे उदाहरण म्हणून देता येईल. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या सेनेला मुंबईतून बळ मिळायला हवे.

– राजेंद्र पंढरपुरे
9623442517